रुद्रचा पावसाळी बाप्तिस्मा

रुद्रचा पावसाळी बाप्तिस्मा 

   वर्ष २०१८ मध्ये  संपूर्ण पावसाळयात मस्त पाऊस होऊन सुद्धा आम्हाला मनाला समाधान देईल असा पावसाळी ट्रेक करता आला नव्हता, त्यामुळे पावसात चिंगाट भिजायची इच्छा अपूर्ण राहिली होती. अशाच एका ऑगस्ट महिन्याच्या शनिवारी  ऑफिस सुटताना निलेश माझ्याकडे आला आणि म्हणाला कि सर रुद्रला  एकदा जरा पावसाळी ट्रेकला घेऊन जाऊ म्हणजे त्याला पावसाची सवय होईल. आमच्या ट्रेक ग्रुप मध्ये पावसाची सवय म्हणजे तुफान पावसात नखशिखान्त भिजणे आणि ट्रेक संपेपर्यंत ओले कपडे न बदलता पावसाचा आनंद घेणे. पावसात चिंगाट भिजून अंगावरच  कपडे वाळवून पुन्हा पुन्हा पावसात भिजणे या अशा भिजपावसा मुळे पाऊस अंगात चांगला लोणच्यासारखा मुरतो आणि मग माणूस पाण्याने संपृक्त झालेल्या स्पंजसारखा कुठल्याही पावसाला कधीच घाबरत नाही. माझ्यामते  कुठल्याही एकदिवसाच्या पावसाळी ट्रेकवर  जर ट्रेकर रेनकोट घालून जात असेल तर ते म्हणजे अंतराळवीराचा  सुट घालून पाण्यात पोहायला उतरण्यासारखे आहे- म्हणून नीलेशच्या या छोट्या आवृत्तीला आमच्या पद्धतीने पावसाळी ट्रेक करायला  लावणे म्हणजेच आमच्या पद्धतीने बाळाचा पावसाळी बाप्तिस्मा करणे -  
           अरे पण अजुन निलेशचा मुलगा रुद्रची तुमची ओळख नाही झाली-  रूद्र हे जरा वेगळे प्रकरण आहे हे पोरगे पक्के  खोडकर आणि गुणा बाबत बापावर गेलाय- पण शरीराबाबत मात्र  वयापेक्षा जरा जास्त गोलमटोल व टुमटुमीत आहे- याला जास्त धावपळ जास्त कष्ट नको] हा जीव सांभाळून सर्व गोष्टी  करणार] कमीत कमी शारीरिक हालचाली करणारा] दुसरीत  शिकणारा पण पाचवीचा वाटणारा मुलगा आहे-  ह्याची एक गंमत तुम्हाला सांगतो-  हा या पूर्वी उन्हाळ्यात ट्रेकवर येताना दोन स्वच्छ पांढरे रुमाल घेऊन आला होता]  एक  रुमाल चेहरा पुसायला तर दुसरा बूट स्वच्छ करायला-  आणि बूट  का स्वच्छ करायचा  तर त्याला त्याचा बूट घाण झालेला आवडत नाही- ही अतिशयोक्ति नाही-  आम्ही त्याला एकदा एका छोट्या ट्रेकला घेऊन गेलो- तर पठ्याने मध्ये एका ठिकाणी मस्त बसून खिशातून  स्वच्छ रुमाल काढून मातीचे भरलेले बूट स्वच्छ केले होते- मी म्हणालो बापरे इथून पुढे पोराचे गुण बापात आले तर काय? आमची ट्रेकची बॅग तर फक्त रुमालांनीच  भरायची- ज्यामुळे आमच्या मनात निलेश विषयी हा संभ्रम निर्माण झाला अशा ह्या असा हा अति स्वच्छ बाळाला  आता  पावसात चिखलात मस्त लोळुद्यायचे  आणि  आपल्या ट्रेकधर्माची दीक्षा द्यायची-  त्याशिवाय हा छोटा निलेश काही सुधारणार नाही- चला तर मग असे एक सुंदर ठिकाण माझ्या माहितीत होते त्याची छोटीशी सफर यानिमित्ताने आपण करू ते ठिकाण म्हणजे  अजापर्वतावर असणारा  वाल्मिकी आश्रम -



वाल्मिकी आश्रम हा नाशिक पासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर आहे- इथे पोहोचायचा मार्ग नाशिक→इगतपुरी→कसारा→वाशाळा फाटा येथून डावीकडे वळण घ्यावे  ढाकणे→डोळखांब→साकुर्ली हुन लगेचच  उजवे वळण घ्यावे व  डेहणे रस्त्यावर डेहणे  गावाच्या अलीकडे उजव्याबाजूला वाल्मिकी आश्रमाच्या कमानीतून आजोबा डोंगराकडे गेला आहे-  वाल्मिकी आश्रमात खाण्याची काही स्वतंत्र सोय नसल्याने खाण्याचे पदार्थ स्वतः सोबतच बांधून नेणे इष्ट ठरते- या  आश्रमात उन्हाळ्यात सुद्धा पाणी प्यायला  मुबलक आहे- त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण नाही- आमच्या ग्रुपमध्ये ट्रेकवर  येणे  सहसा कोणी टाळत नाही- पण तरीसुद्धा जाण्याच्या दिवशी  रविवारी सकाळी सहा वाजता वाल्मिकी आश्रमाकडे जाण्यास आम्ही फक्त  चार जण तयार होतो] निलेश] रुद्र] मी आणि शरयू- रुद्र सुरुवातीला गाडीमध्ये उत्साहा मध्ये बडबड करीत होता- नंतर मात्र तो कंटाळून झोपी गेला-  आम्ही नाशिक मुंबई रस्त्यावर कसारा गावाचे वळण सोडून पुढे गेल्यावर वाशाळा फाट्यावर पोहोचलो या फाट्यावरून डाव्या बाजूला वळण घेऊन ढाकणे गावाकडे निघालो- वाशाळा फाटा ते डेहणे गाव हा रस्ता पावसाळ्यात अतिशय सुंदर असतो-




आजूबाजूस हिरवीगार शेती]  हिरव्या रंगाच्या विविध छटा पर्णराजी मध्ये  दाखविणारी वृक्षवल्ली] संततधार असणारा पावसामुळे सातत्याने वाहणारे निर्झर आणि  गच्च भरलेले ओढे व नद्या कशा कशाचे वर्णन करावे] स्वतःच्या नेत्रांनीच याचा आनंद घ्यावा-  यानंतर  प्रथम आपण डोळखांब येथे पोहचतो-  तेथे पावसाळ्यामध्ये नदीमधील मासे व खेकडे छान मिळतात आणि हो  येथे पण आमचे आवडते खाद्य मस्त गरम गरम वडापाव सुद्धा मिळतो- 
Now it has become staple diet of our Group for starting the trek येथून  पुढे तसेच साकुर्ली कडे निघायचे थोडे पुढे गेल्यावर एक रस्ता उजव्या बाजूस फाकतो हा  रस्ता आपल्याला डेहने कडे घेऊन जातो- या वाटेवरच्या नदीचा पूल एकदम खाली आहे-
म्हणजे जास्त पाणी आल्यास पूल बंद होतो- तसेच या नदीमधून वाहणाऱ्या पाण्याचा वेळ खूपच जोरात असतो- नदी ओलांडून पुढे आल्यावर थोडा खराब रस्ता आहे- त्यानंतर एक छोटा चढ येतो तेथे डाव्या बाजूला जाणारा रस्ता डेहणे गावात जातो व उजव्या बाजूला कमानीतून डोंगराकडे जाणारा रस्ता आपल्याला आजोबा (आज्याचा) डोंगराकडे घेऊन जातो- हा रस्ता खूपच खराब आहे त्यामुळे शक्यतो मोठी गाडी असेल तरच धाडसाने पुढे जावे- याच  रस्त्याने पुढे गेल्यावर डाव्या व उजव्या बाजूस एक घरकुल समूहाचे बांधकाम चालू असल्याचे दिसते- इतक्या अंतर्गत जंगलांमध्ये बांधकामाला कोणी परवानगी दिली असेल
?  म्हणजे इथं सुद्धा आता लोकांचा गजबजाट  सुरू होऊन इथले नैसर्गिक वातावरण खराब होणार- हे पाहून आमच्या निसर्ग प्रेमी मॅडमनी शाप दिला  कि  देव करो आणि याची घरकुल कोणी खरेदी करूच नयेत- या बांधकामाच्या थोडे पुढे शंभर ते दोनशे मिटर गेल्यावर समोर पूर्व दिशेला एक  उंच पर्वत दिसू लागतो हाच  तो अजा पर्वत]
याचे नाव अजा पर्वत असायचे कारण याचा संदर्भ  रामायणाशी  आहे- रामाने सीतेला आयोध्येतून निष्कासित केल्यावर  सीता वाल्मिकी आश्रमामध्ये राहावयास आली- येथेच तिला लव कुश हि पुत्र प्राप्ती झाली असे म्हणतात-  लाव कुश वाल्मिकी ऋषींना अजोबा  असे संबोधत- आपण ज्या आज्या पर्वताकडे चाललो आहोत त्याच्या मध्यावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे सीता लव कुश व वाल्मिकी ऋषी याच आश्रमात राहत होते अशी आख्यायिका आहे म्हणूनच या पर्वताला आजा पर्वत किंवा आजोबाचा डोंगर असे म्हणतात- 
समोर दिसणारा गाडीचा रस्ता तसाच  डोंगरावर जाताना दिसतो]
पण वाटेमध्ये चार ते पाच ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या मुळे चार चाकी गाडी पुढे नेणे इष्ट नाही- यामुळे गाडी व व्यक्ती दोघांच्या सुरक्षेसाठी  आम्ही पायथ्यालाच गाडी पार्क केली- या डोंगराच्या पायथ्यापासून वाल्मिकी आश्रम साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे हा रस्ता हळूहळू चढाईचा आहे- आम्ही गाडी पार्क करीत  असतानाच पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या आणि सर्व आसमंत पुन्हा पावसाळी ढगांनी धुंद होऊन गेला- पाऊस बघितल्यावर रुद्र महाराज थोडे टरकले- पण निलेशने त्याला थोडे समजावल्यावर हा आजचा हिरो गाडीतून उतरला] छोटीशीच  चढाई व आश्रमात पाण्याची उपलब्धी असली तरी आम्ही एका पाठ पिशवीमध्ये दोन पाण्याच्या बाटल्या] औषधे] टॉर्च] काडेपेटी] मेणबत्ती] छोटा चाकू] छोटादोर या वस्तू कोणत्याही परिस्थितीत बरोबर घेतो- जंगल दाट असेल तर मात्र छोटा कोयता बरोबर घेतो- या सर्व तयारीनिशी आम्ही गाडीच्या बाहेर पावसात निघालो- कितीही वेळा पावसात भिजला तरी कोरड्या शरीरावर अचानक पडणारे पावसाचे थेंब हि एक हवीहवीशी वाटणारी शिरशिरी या शब्दाप्रमाणे सर्वांगाला जाणवणारी अनुभूती  देऊन जातात- उन्हाळ्यात गार पाण्याने अंघोळ करताना पहिला गार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतल्यावर जी अवस्था होते तशीच माझी नेहमी अवस्था  होते- निलेश ला पाऊस वाऱ्याची काहीच अडचण नसते- शरयू मॅडम मात्र पावसाच्या नाही पण गार वाऱ्याच्या  त्रासाने  जर्किन घालतात- माझे लक्ष मात्र आमच्या नातवाकडे म्हणजे रुद्र कडे होते] रुद्र मात्र जर्किन विना बहुदा पहिल्यांदा पावसात बाहेर पडला होता आणि अचानक सुरू झालेल्या जोरदार सरीच्या पावसाने पहिल्याच झटक्यात आम्ह सर्वांना  नखशिखांत भिजवले- त्यामुळे रुद्राचा चेहरा अचानक अंगावर पाणी पडल्यानंतर मांजराचा जसा होतो तसा झाला होता- चला सुरुवात तर मस्त झाली-

          आम्ही हळूहळू  गाडीरस्त्याने चढायला सुरुवात केली- सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याची माती वाहून जाऊन छोटे छोटे दगड उघडे पडले होते- दोन्ही बाजूला खोदलेल्या चरा मधून पाणी वेगाने खालच्या बाजूच्या ओढ्याकडे वाहत होते- मधून मधून मस्त गार वारा वाहत होता- अशा ह्या अल्हाददायक वातावरणामध्ये आम्ही चौघे आश्रमाकडे चालू लागलो- खरे तर आश्रमाकडे जाणारा हा रस्ता खूपच मोठा आहे- परंतु पावसाच्या संततधारेमुळे रस्ता फक्त लौकिक अर्थाने रस्ता म्हणायचा नाहीतर याचे रूपांतर गावाकडच्या बैलगाडी वाटे सारखे झाले होते-

अजा  पर्वत हा   संरक्षित प्रभाग असल्याने याठिकाणी झाडी खूप छान आहे आणि  सकाळची वेळ असल्याने विविध पक्षांच्या सुमधुर गायनाचे आवाज येत होते पण पक्षी तर दिसत नव्हते- थोडा वेळ अशा सुंदर वातावरणात  चालल्यानंतर  आमचा हिरो थोडाप्रफुल्लित  झाला- इतक्या मस्त हिरव्यागार पावसाळ्यातल्या जंगलाचा त्याचा पहिलाच अनुभव असल्याने त्याला आजूबाजूच्या गोष्टी बाबत खूपच उत्सुकता होती- त्यामुळे तो  निलेशला सारखा  क्वेश्चन बँक मधून धडाधड प्रश्न विचारीत होता- निलेश ने काही काळ  त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करून पाहिला] पण थोडे प्रश्न जास्त  झाल्यावर त्याने सादर मशिनगन चा रोख  माझ्याकडे करून दिला- मग काय मी आणि रुद्र आनंदाने  सर्व निसर्ग धुंडाळत  पुढे जाऊ लागलो-   प्रश्न तर कायपाणी असेच का पडते? पानांच्या हिरव्या रंगात इतके फरक का मुंग्यांच्या वारुळात पाणी गेल्यावर त्या काय करतातपक्षी का गाणी म्हणतात




यातल्या काही  प्रश्नांची उत्तरे मलाच माहीत नसल्याने माझ्या परीने त्याचे शंका समाधान करत आम्ही मार्गक्रमण करीत पुढे चालत होतो- मध्येच त्याला ट्रेकिंगचा अनुभव मिळावा म्हणून आम्ही गाडी रस्ता सोडून पायवाट धरून थोडा शॉर्टकट मारून  रस्ता सर केला-   




मधून मधून पावसाच्या सरी येत होत्या] तेवढ्या पुरता रुद्र थोडा आखडायचा   पण पुन्हा मोकळा होऊन चालू लागायचा- आजूबाजूचे वातावरण इतके सुंदर होते की आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता पावसाचा आवाज] झाडांच्या पानांची सळसळ व सभोवती पसरलेल्या हिरव्या रंगाच्या विविधतेचे दालन अनुभवत होतो- आश्रमाच्या मार्गावर एक एक छोटा ओढा वाटेत आडवा येतो- डोंगर माथ्यावर  सातत्याने पाऊस चालू असल्यामुळे याचे वाहते  पाणी अतिशय स्वच्छ निवळशंख होते- असे वाहते पाणी प्यायची  खरी मजा जनावरांसारखी लपलप जिभेने पिण्यात आहे- मी असा चान्स कधीच सोडत नाही- त्यामुळे मी पाणी तश्या पद्धतीने प्यायला सुरुवात केली- मग काय रुद्र महाराजांना त्याची इतकी मजा वाटली की त्याने  व निलेशने  सुद्धा हा प्रयत्न केला- 

चला] मी म्हटले ट्रेक वरच्या अशाच गमतीजमती मुळे मुलांना टीव्ही पेक्षा निसर्ग अनुभवण्यामध्ये  इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो] म्हणून मुलांना लहानपणीच निसर्ग अनुभवण्याकरिता ट्रेकला न्यावे- आमचे साग्रसंगीत जलपान  पार पडल्यावर थोड्याच अंतरावर पुढे असणाऱ्या वाल्मिकी आश्रमा जवळ आम्ही पोहचलो- 
आश्रमाची जागा खूप मोठी आहे] येथे मंदिर] साधूंचा आश्रम] दोन छोटी मंदिरे] काही  वीरगळ व   जवळपास पन्नास लोक राहू शकतील इतका मोठा डोमच्या आकाराचा निवारा आहे-





 आश्रमाच्या चारही बाजूस असणारी प्रचंड झाडी]

पाठीमागे पसरलेला उंच असा अजा पर्वत] सातत्याने  जोरदार पडणारा पाऊस]  आजूबाजूस दाटलेल्या  धुक्यामुळे कुंद आणि धुंद असे वातावरण यामुळे सर्व आसमंत रहस्यमय गूढ असा वाटत होता- पावसाळ्यामध्ये या आश्रमामध्ये मुंबईचे खूप लोक येतात- त्यामुळे येथे बऱ्यापैकी चहल पहल राहते-    आम्हाला पाहून साधू महाराजांनी आश्रमात बोलावून घेतले व अशा थंड हवेत मस्त गरम गरम चहा प्यायला दिला- *स्वर्गसुख म्हणजे शेवटी काय* ते हेच कि मनुष्य वस्ती पासून इतक्या आत जंगलात पावसाने सर्वांग चिंब भिजले असताना गरम गरम चहाचा घोट अन्ननलिकेचे मधून पोटात जाताना जो गरम उबदार अनुभव देतो तोच- साधू महाराजांनी आमची अतिशय आस्थेने विचारपूस केली आणि पिठलं भात खाण्यासाठी थांबायचा आग्रह केला- पण आम्ही जेवण बरोबर आणले असल्याने] मोठ्या कष्टाने महाराजांचा आग्रह टाळून आम्ही आश्रमाच्या पाठीमागून अजा पर्वतावर असणाऱ्या  सीतेच्या पाळण्याकडे जाणारी वाट पकडली- हि वाट अगदी छोटी आहे व अतिशय गर्द झाडीतून डोंगरावर जवळपास पन्नास अंशाचा कोण ठेवून वरती वरती चढत जाते- आश्रम सोडल्यावर या वाटेवर प्रथम एक मोठा झरा लागतो-

हा झरा पावसामुळे चांगलाच  वाहत होता- मी या वाटेने यापूर्वी सीतेच्या पाळण्यापर्यंत जाऊन आल्यामुळे मला ही वाट माहिती होती- तुम्हा  सर्वांना कॉगो ॲमेझॉन च्या जंगलाच्या झाडीचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एकदा तरी या वाटेने सीतेच्या पाळण्यापर्यंत जाऊन या- या वाटेवर  पायामधे   कुजलेली पाने व माती याचा चिखल] आजूबाजूची शेवाळलेले झाडे] वरून सातत्याने  पडणारा पाऊस आणि  धुंद हवा हिच अमेझॉनच्या जंगलाची   अनुभूती- झऱ्या पासून पुढे  या वाटेवर एक उंच झाड आहे]
त्याचा बुंधा त्रिकोणी असून ते  इतके मोठे व मजेशीर आहे कि त्याच्या तीन कोपऱ्या मध्ये तीन लोक व्यवस्थित उभे राहू शकतात  व इथे छान फोटोग्राफी करता येते-

पुढे जाताना  आजूबाजूच्या दगडांवर छान शेवाळाचे थर जमले होते-
फर्नच्या लांब वर असणाऱ्या  फांद्यांच्या पानांवरुन पाण्याचे थेंब ठिपकत होते- जंगलातील वेली या सातत्याने वाहणाऱ्या वाऱ्याचा पावसामुळे थंडीपासून उब  मिळवायला जणू झाडांना घट्ट लपेटून बसल्या होत्या-

जवळपास अशा मस्त वातावरणामध्ये आम्ही अर्ध्याहून अधिक डोंगर चढून गेलो- पण पुढे झाडी अजुन घनदाट होऊ लागली कोयत्याने मध्ये येणाऱ्या फांद्या तोडत तोडत आम्ही पुढे चाललो होतो- पण आता मात्र रुद्रला पुढे घेऊन जाणे थोडे कठीण वाटू लागले- वाटेवर काही ठिकाणी छोटे छोटे खड्डे त्यामध्ये पसरलेल्या वेली] त्यात  कुजलेली पाने  व चिखलामुळे  फसवी जमीन त्यामुळे मी सुद्धा वाटेत दोन तीनदा अडकलो होतो-  पाऊस तर सातत्याने चालूच होता] माझ्या पाठोपाठ शरयु पण अडकल्याने आम्ही सीतेच्या पाळण्याचे पुढच्या वेळी दर्शन घ्यायचा निर्णय घेऊन मागे फिरलो- पण उतरताना हीच वाट जास्त सावधगिरीने उतरवावी लागली- ट्रेकिंग नव्याने सुरु  करणाऱ्यांनी ही एक  महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी  कि] आपण जेव्हा गड-किल्ले डोंगर चढतो तेव्हा आपला गुरुत्वाकर्षणमध्य  पुढे असल्याने आपण सहजतेने चढतो- पण तोच मध्य आपल्याला उतारावर सांभाळता न आल्यामुळे आपण सहज आपटू शकतो]  म्हणून कोणत्या ही उतारावरून खाली येताना वेग  नियंत्रित ठेवून काळजीपूर्वक उतरावे-  आम्ही हळूहळू ही पायवाट उतरून पुन्हा आश्रमाजवळ  आलो- इतकावेळ पावसात भिजून सुद्धा शरयू चे मन तृप्त न झाल्याने मॅडमनी चक्क वाहत्या झऱ्यात बसून घेतले] मग काय रुद्र महाराज सुद्धा आजीच्या बरोबर झऱ्यात उतरते झाले- हे पाहून मी आणि निलेश मात्र खुश झालो कारण अजून तरी रुद्र थंडी पावसाची तक्रार करीत नव्हता- थोडावेळ पाण्यात खेळल्यावर दोघांना घेऊन आम्ही पुन्हा आश्रमात आलो- पण आता आश्रमात अजून गर्दी वाढल्याने आम्ही आश्रमाच्या समोरच्या पाय वाटेने खालील बाजूस असणाऱ्या कुंडा कडे जाण्याचा  निर्णय घेतला-
या पायवाटेचा बराच भाग पायऱ्यांनी बांधून काढल्यामुळे वाट सोपी आहे- या वाटेने खाली जाताना पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा नखशिखांत भिजण्याचा आनंद मिळाला- या पायवाटेला खाली दोन कुंड आहेत-

 ती कुंडे पाहून पुन्हा पायवाट चढून आम्ही आश्रमात आलो- साधू महाराजांना भेटून त्यांचा निरोप घेतला व डोंगर उतरायला सुरुवात केली- उतरतांना मात्र पाऊस जास्त नव्हता आणि  सर्वांना भूक सडकून लागली होती- त्यामुळे आम्ही पटापट खाली पोहोचलो- जसजशी गाडी जवळ यायला लागली तशी रुद्र ची भुकेमुळे गडबड सुरू झाली- पण तो आता मात्र पावसाची किंवा थंडीची तक्रार करीत नव्हता] न का अंगावरच्या ओल्या कपड्याची तक्रार करीत होता- जो मुलगा बुटा वरची माती पुसायला रुमाल वापरायचा तो चिंब भिजून सुद्धा कपडे बदलायचे म्हणून तक्रार करीत नव्हता- याचा अर्थ रांगडा सह्याद्री ग्रुपने आपल्या एका छोट्या सदस्याचा पावसाळी ट्रेकचा बाप्तिस्मा आज अजापर्वताच्या साक्षीने अन् आशीर्वादाने पूर्ण केला- अरे हो पण या ट्रेकच्या वर्णनानंतर एक सांगायचे राहून गेले की रुद्र ने परतीच्या प्रवासात गाडीत बसल्यावर एक मूलभूत प्रश्न रामायण ऐकल्यावर रामाची सीता कोण या थाटात तुम्ही दिवसभर सीता] वाल्मीकि व  लव कुश यांची नावे घेत होता] ते कोण? असा मोठा प्रश्न विचारला आणि आम्ही धन्य झालो- उरलेल्या प्रवासात मी रुद्राला रामायण सांगत माझ्या कथाकथनाचे कौशल्य आजमावत होतो आणि निलेश मात्र आजोबा नातवाच्या गप्पांकडे आनंदाने पाहात मुलाचा पावसाळी बाप्तिस्मा मस्त पार पडल्याने तृप्त मनाने नाशिकच्या दिशेने गाडी चालवू लागला-

Comments

Nilesh007 said…
खूप छान सर
Ajay Hatekar said…
आपल्या पहिल्या ब्लॉगबद्दल खूप अभिनंदन सर....नैसर्गिक रुद्रावतारच्या वर्णनाने लेख चिंब चिंब भिजलाय ...
Unknown said…
इन्क्रेडीबल एक्स्पीडीशन टिम सह्याद्री.
Nilesh007 said…
हो ना सर dr रावराणे सरांनि खरच खूप छान लिहले आहेत
रांगड्या सह्याद्रीच्या भेटीसाठी कुठेही जायची गरज नाही...
थेट इथेच थांबतो हा प्रवास..
धन्यवाद...
shilpa krupesh said…
अतिशय सुंदर, निसर्गच्या सानिध्यात, डोंगर, किल्ले यांची सफर अविस्मरणीयच 👍
Nilesh007 said…
धन्यवाद!
Nilesh007 said…
धन्यवाद सर
Unknown said…
लय भारी
Unknown said…
खुप सुंदर अनुभव,शब्द रचना सरळ, नेटकी वाचतांना अस वाटत होत की आम्ही आहोत सोबत आहोत.
निलेश sir, madam, rudra mast nd evergreen sir badiya
Sanjay amrutkar said…
वाह..अतिशय छान ट्रेक ब्लॉग.. फाकणे,निष्कासित,हे शब्द आवडले.सर लिहित रहा..दृष्टी अजून डोळस होईल.
Unknown said…
Rainy treak experience,really thrilling.Your passion for outdoor got good direction.Keep on writing.
Unknown said…
मित्रा, अतिशय सुंदर वर्णन केलेस. डोळ्या समोर तो निसर्ग उभा राहिला. भरपूर पाऊस आणि गर्द झाडी अनुभवली असल्यामुळे तर visualisation सोपं होतं. हा हाती घेतलेला वसा आता सोडू नकोस.
Unknown said…
Dada,WHILE READING I EXPERIENCED A GREAT ADVENTURE AND FELT FRESH AND NTERESTING LINE BY LINE.
UR WORDS WAS very expressive
My self and Vinod really enjoyed it
Sandeep Rathod said…
सरजी खुप सुंदर अनुभव,शब्द रचना. वाचतांना अस वाटत होत की आम्ही सोबत आहोत.keep it up... Excellent work...
Unknown said…
Sir khupach chhan khare life enjoy kara aahat
Unknown said…
कमेंट पोस्ट करणार: आदेश सावंत.

Popular posts from this blog

किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव