किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव

    किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव

     जुन्नरचा सातवाहनकालीन नाणेघाट आणि आजूबाजूच्या ज्ञात अज्ञात घाटवाटांच्या संरक्षणासाठी सभोवतालच्या योग्य आणि उंच जागा पाहून बांधलेले पंचपाण्डव म्हणजेच जीवधन, चावंड ,सिंदोळा,निमगिरी आणि हडसर हे पाच किल्ले होय.   
      आम्हाला ह्या पंचपांडवांचे दर्शन करावयाचे होते, त्यावेळी आमचे जुन्नरचे खास मित्र माजी सैनिक व वनरक्षक श्री रमेश खरमाळे सर यांनी आम्हाला सल्ला दिला कि,पावसाळयात हडसर किल्ला करा अतिशय अप्रतिम आहे. खरमाळे सर म्हणजे जुन्नर परिक्षेत्राचा चालताबोलता एनसायक्लोपेडियाच किंवा गूगल  मॅपच. जुन्नर परिक्षेत्राची खडा नि खडा माहिती सरांना आहे, येथे कुठे भेट द्यावी ,केव्हा द्यावी,काय पाहावे आणि त्यापेक्षा कोठे जाऊ नये आणि काय करू नये या माहितीचा सर एक खजिनाच  आहेत. सर म्हणजे एक अजबच व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वर्णन करायचे म्हणजे एक स्वतंत्र लेख होईल.
    आज आपले ध्येय किल्ले हडसर आहे. सरांच्या सल्ल्यावरून रवीवारसाठी किल्ले हडसर चा बेत नक्की करून मी सदर बाब नवीन प्लॅन म्हणून आमच्या रांगडा सह्याद्री ग्रुपच्या व्हॉटसएप ग्रुपवर टाकला. अलीकडे सगळी ट्रेकर मंडळी आपापल्या ग्रुपला काहीतरी नाव देतात म्हणून आम्ही सुद्धा आमचे बारसे करून घेतले. आमचा ग्रुप तसा फार मोठं नाही बरका इनमीन पाच सदस्य आहेत त्यात, प्रथम मी तुम्हाला ग्रुपच्या सदस्यांची ओळख करून देतो म्हणजे आपण ट्रेकवर  जायला  मोकळे. 
       प्रथम मी माझी स्वतःची ओळख करून देतो, मी कोल्हापूरकर आहे.  त्यामुळे लहानपणापासून गावभर फिरण्याचा म्हणजे कोल्हापुरी भाषेत उंडारण्याचा नादच लै खुळा आणि तशी  सुट्टीच्या दिवशी घरी न बसण्याची सवय लागली. त्यात शिक्षणामुळे जास्त काळ पुण्यात राहिलॊ त्यामुळे जरा बाकीच्यांपेक्षा पुणेरी शहाणपण जास्त म्हणून ग्रुपचा नेता. 
        दोन नंबर ला आमची अर्धांगिनी शरयू , या चुकून साताऱ्यामध्ये जन्मल्या या जर हिमाचल किंवा नेपाळ मध्ये असत्या तर एव्हरेस्टवर घर बांधून राहिल्या असत्या इतक्या डोंगरप्रेमी.  इतर वेळी घराशेजारी मॉलमध्ये जायचे ठरवायला मॅडमना आठवडा लागतो पण डोंगरावर जायचे म्हटले कि मॅडम सकाळी चार वाजता सगळयाचा डबा घेऊन तयार असतात. कौतुकाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सगळयात उंच असलेले कळसूबाईचे शिखर मॅडम ने २५ वेळा सर केले आहे, त्यापैकी पाच ते सहा वेळा रात्री त्यांनी  शिखराजवळच्या मंदिराजवळ मुक्काम केला आहे. 
        तिसरा सदस्य म्हणजे आमचे हवाईदलातून निवृत्त झालेले श्री. भिंगोळे सर, डोक्यावरचे सगळे  केस जरी पांढरे  झाले असलेतरी डोंगरावर माणूस एकदम अवखळ अबलख वारूच होतो आणि  मग त्यांना  आवरताना मात्र  आमची तारांबळ  उडते. पण माणूस सैन्यदलातील असल्यामुळे  एकदम वक्तशीर, शिस्तशीर आणि आटोपशीर असतो . 
         चवथा सदस्य म्हणजे निलेश, हा ग्रुप मधील सर्वात लहान , सगळयात तंदुरुस्त  आणि मस्तीखोर पण याच्यामुळे ग्रुप मध्ये ताजेपणं आणि जिवंतपणा टिकून राहिला. तसा  हा ट्रेक ला पूर्वी  यायचा तो फक्त सेल्फी काढून दररोज नवीन नवीन स्टेटस ठेवणे या माफक अपेक्षेनं ,पण नंतर मात्र किल्ल्याच्या ओढीने येऊ लागला. याचा फायदा म्हणजे या पूर्वी च्या ट्रेकला माझे व शरयूचे एकत्र फोटोच यायचे नाहीत .  पण हा आता आमच्या प्रिवेंडींग  शूट ला आल्यासारखा आमचे फोटो काढतो. या फोटोशूटमुळे वेळ जातो पण आठवणी खूप छान राहतात, याचे सगळे श्रेय या ३४ वर्षाच्या  बाळाला जाते. 
        सध्या या ग्रुपमध्ये एक नवीन ऍडिशन झाली आहे ते म्हणजे आमचे प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे मित्र श्री अजय हातेकर. आमच्या ग्रुपमध्ये आधीच दोन फोटोग्राफर होते ते कमी के काय म्हणून देवाने एक  प्रोफेशनल फोटोग्राफर पाठवला. अजयजींचे कौतुक म्हणजे ते कॅमेऱ्याची भली मोठी बॅग त्यामध्ये पाण्याच्या तीन बाटल्या व त्याहून महत्वाचे म्हणजे हातेकर वहिनींनी भल्यापहाटे उठून सर्वांसाठी दिलेला  BRUNCH    { BREAKFAST AND LUNCH}.
         अरे !! रे ! मी जरा विषय सोडून बाजूला वाहवत गेलो.  पण आपल्या  सहकाऱ्यांची ओळख करून  दिल्याशिवाय ट्रेकची मज्जा कशी घेणार,  चला तर मग आपण परत आपल्या विषयाकडे वळूया  "  हडसर किल्ला " 
          हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असे असून हा किल्ला कुकडी नदीच्या काठावर वसलेला आहे. याची उभारणी   इ. पु. २३० च्या दरम्यान सातवाहनांच्या राजवटीत झाली.  राजवटीच्या काळातील किल्ल्याचे वैशिष्ट्य  कातळात कोरलेले दरवाजे , पायऱ्या व लेणी.  या किल्ल्याचे काही ठराविक विशेष संदर्भ म्हणजे  शहाजीराजे यांनी  १६३७ मध्ये हा किल्ला मोगलांना दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये साल्हेर विजयानंतर हा किल्ला पुन्हा जिंकला. औरंगजेबाने १७०२ मध्ये पुन्हा हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रीच ने शिवनेरी किल्ला घेतला त्यावेळी हडसर किल्ला त्याच्या ताब्यात आला. या किल्ल्याचे इतके ऐतिहासिक निरास वर्णन वाचून कंटाळलात ना, चला तर आता आपण स्वतः जाऊन हे  नैसर्गिक सौंदर्यवान दुर्गरत्न पाहू. निसर्ग सौंदर्यपूर्ण हडसर पाहायचा असेल तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये पाहावा. या काळात स्वच्छ वातावरणामुळे चावंड किल्ला, जीवधन किल्ला, निमगिरी किल्ला  आणि माणिकडोह जलाशय अगदी अप्रतिम दिसतात पण जर पावसाचये थ्रिल अनुभवायचे असेल तर जुलै महिन्याच्या  शेवटी किंवा जुलै महिन्यात  या किल्ल्याला भेट द्यावी. या काळात वारा  व  पावसाचा थरारक खेळ अनुभवायला  मिळतो. 
         श्री खरमाळे सरानी हडसर किल्ल्यासाठी एकदिवस आधी या असा निरोप दिल्यामुळे आमच्या ग्रुपमधील दोन लोकांनी आधीच येणार नाही म्हणून सांगितले त्यामुळे जवळपास ट्रेक कॅन्सल होऊ लागला पण शरयू आणि निलेश यांनी हट्ट केल्यामुळे आम्ही तिघे जुन्नर मुक्कामी एकदिवस आधीच पोचलो. 
          जुन्नर गावातून  दुसऱ्या दिवशी प्रातःकाली ०६ : ०० वाजता आम्ही किल्ले हडसर च्या दिशेने गाडी चालवायला सुरवात केली, गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून उजव्या बाजूने वळून माणिकडोह जलाशया कडे जाणारा रस्ता पकडून गाडी हळू हळू पुढे जाऊ लागली.  पावसाळी सकाळ असल्याने वातावरण धुक्याने भरलेले होते,हवा कुंद होती,दृश्यमानता कमी होती,मधूनच जोराचा वारा जोरात यायचा आणि मस्त पावसाचा शिडकावा करून जायचा. धुंद करणारी पावसाळी सकाळ मस्त होती. या रस्त्यावर धरणाच्या भिंतीच्या कुशीत महाराष्ट्राचे एकमेव बिबट्या संरक्षित निवारा केंद्र लागते. या केंद्र जवळून छोटा घाट चढून वरती गेल्यावर माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसते. हडसर किल्ल्यासाठी याच रस्त्याने पुढे जात राहताना उजव्या बाजूस संपूर्ण डोंगररांग दिसते. जुने, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध यामध्ये या डोंगररांगावरून अविरत कोसळणाऱ्या धबधब्याच्या खट्याळ पाण्याला पश्चिमेकडून येणारा सुसाट वेगाने वाहणारा वर हाताला धरून पुन्हा डोंगरावर पाठवून देतो याला हल्लीच्या भाषेत REVERSE WATERFALL  म्हणतात. या ठिकाणी असं खूप दिसतात पण एवढे बघून मन भरत  नाही आणि मोठ्या कष्टाने पुढे निघावे लागते. 

 
       पावसाळी सकाळ असल्याने आजूबाजूला फारशी चहलपहल नव्हती,पाऊस मस्त पडत होता म्हणून अवखळ झरे बागडत होते


आणि सूर्याची वाट पाहत हिरव्यागार मखमली रंगाची चादर ओढून चावंड किल्ल्याच्या रांगेतले डोंगर माणिकडोह जलाशयात  पाय सोडून बसलेले दिसत होते. आमचे दोन्ही फोटोग्राफर सातत्याने गाडी थांबवून हा सर्व आसमंत फोटोमध्ये साठवण्याचा  प्रयत्न करीत होते, मी मात्र माझ्या मनाच्या पटलावर त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने या सौन्दर्याची थ्रीडी प्रतिमा प्रिंट करीत होतो. खरे तर येथून पुढे जायची इच्छा होत नव्हती पण किल्ल्याची ओढ जास्त असल्याने या दोन्ही फोटोग्राफर्सना  सारखे हल्या हल्या करीत पुढे ढकलावे लागत होते. हडसर किल्ल्यावर जाणाऱ्या तीन वाटा आहेत. दोन वाटा हडसर गावातून उजव्याबाजूने असणाऱ्या मंदिरापासून वर चढून जातात. पुढे त्यातील एक वाट पश्चिमेकडे वळून किल्ल्याला फेरा मारून खिंडी कडे  जाऊन तिसऱ्या वाटेला मिळते . दुसरी वाट पुढे उंच चढत जाऊन कातळाला जाऊन भिडते हीच पुढे कातळात ठोकलेल्या खिळयाचा आधार घेऊन दक्षिण पूर्व बुरुजावर मारुती शिल्पा समोर पोचते. श्री  खरमाळे सर यांच्या सल्यानुसार पावसाळा  असल्याने या मार्गाने जाणे थोडे कठीण असल्याने रद्द केले.  हडसर गावापासून साधारण २ ते ३ किमी अंतर पुढे गेल्यानंतर एक हापसा लागतो,  तेथून आत उजव्याबाजूस दीड किमी अंतरावर  आतल्या बाजूस हडसर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या एक छोट्या वाडीच्या पिछाडीपासून तिसरी वाट सुरु होते . हि वाट  मात्र पावसाळा सोडुन  इतर वेळी सुरक्षित आहे पावसाळ्यात पूर्णपणे चिखलात भरलेली, छोट्या छोट्या ओहोळांनी  भरलेली आणि प्रचंड निसरडी आहे.

         आम्ही वाडीत पोचलो, गाडी पार्क केली आणि ट्रेक चे आवश्यक सामान सॅकमध्ये भरून घेतले. आम्ही कितीही छोटा ट्रेक असला तरी काही गोष्टी सॅक मध्ये घेतोच त्या म्हणजे ड्राय फ्रुट्स, काही मिक्स कॅडबरी , फर्स्ट एड किट ,टॉर्च, काडेपेटी ,मेणबत्ती, चांगला स्विस नाईफ, लाइटर ,१० ते १५ फुटाचा दोर आणि ३ लिटर पाणी .  या गोष्टी महत्वाच्या आहेत. चिखलामुळे वाट नीट दिसत  न्हवती म्हणून जवळच्या घरात आम्ही चौकशी केली आणि काय तेथील मावशींनी चक्क आज किल्ल्यावर जाऊ नका म्हणून सांगितले. त्या म्हणाल्या पावसाळयात काही दिवशी वाडीवरचे लोक सुद्धा काही अतिशय महत्वाचे काम असेल तरच जातात कारण किल्ल्याच्या दरवाजाच्या अलीकडच्या खिंडीत वारा पिसाटल्यासारखा वाहतो. बापरे हे तर काय नवीनच एवढ्या छोट्या किल्ल्याबाबत हे बाब जरा आश्चर्यकारकच होती. आम्ही आमच्या अनुभवावरून मावशीच्या सांगण्यात ५०% सत्यता धरली आणि म्हणून गावातून कोणी वाट दाखवेल का म्हणून विचारले. मावशीनी आमच्या काळजीने  मात्र लगेचच त्यांच्या नवऱ्याला आमच्याबरोबर पाठविले. बिचारा सकाळीच किल्ल्याच्या पायथ्याला गुरे चरायला सोडून आला होता, काहीशी नाखुशीनेच तो यायला तयार झाला. किल्ल्याकडे चढणाऱ्या खिंडीकडे जाणारी वाट गावाच्या मागच्या बाजूने सुरु होते.
पण एकतर या वाटेचा  अगदी चिखलगुट्टा झालं होता आणि पुढे जाऊन या वाटेला दहा  शेंड्या फुटलाय होत्या म्हणू गावातून वाटाड्या शिवाय पर्याय नव्हता. 
गावातून मागे गेल्यावर वाट लगेच उजव्या बाजूला वळली आणि मग आम्ही शेताच्या पाण्याने भरलेल्या तालीच्या बांधावरून वाटचाल सुरु केली. 
     गडाला आणि खिंडीला डाव्या बाजूला ठेऊन समोरील झाडात लपलेल्या वनखात्याच्या मनोऱ्याकडे  लक्ष्य ठेऊन, हिरव्यागार झाडीमधून  पायवाटावरून अखंडपणे वाहणाऱ्या पाण्यात स्वतःचे वय विसरून छप्पाक छप्पाक असे पायाने आवाज काढत मस्त असं पाऊस अंगावर घेत आम्ही पुढे जाऊ लागलो. 


   असा निसर्ग पाहिल्यावर आमच्या दोन्ही फोटोग्राफर्सनी वाटेत हिरव्या रानात आणि पावसात मनसोक्त फोटोसेशन  करून घेतले. 

   वनखात्याच्या मनोऱ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी  खात्याने छानपणे दगड रचून पायऱ्यांची पायवाट केली आहे.

सदर पायवाटेने चालू लागल्यावर किल्ला डाव्या अंगाला ठेऊन प्रथम पश्चिमेकडे चढाई करावी लागते. साधारण १०० मीटर अंतरावर सदर पायवाट पुन्हा डावीकडे म्हणजे खिंडीकडे वळते. या वाटेवर थोडे पुढे चालल्यावर कातळात खोदलेल्या  पायऱ्या लागतात. 

     सतत पाऊस चालू  असल्यामुळे या पायऱ्या खूपच निसरड्या झाल्या होत्या. डाव्या बाजूला खिंड असल्याने तिकडचा भाग पूर्ण खुला होता अस्मादिक निवांत होते, पण मगच पासून फोटोची धुमशान उडवून देणारे फोटोग्राफर मात्र शेवाळलेला निसरडा मार्ग पाहून जरा हबकले. या नंतर मात्र एकदम सावध होऊन आम्ही हळूहळू शेवाळावर पाय न ठेवता पायऱ्या चढून दुसऱ्या टप्या पर्यंत पोचलो. येथे थोडे छोटे पठार आहे आणि येथेच हडसर गावाकडून येणारी दुसरी वाट डोंगराला वळसा मारून मुख्य वाटेला मिळते. 
  आम्ही इथे पोचलो आणि अचानक पाऊस थांबला आणि काय किल्ल्याची बाजू खालची वाडी,माणिकडोह जलाशय व आजूबाजूचा अतिशय सुंदर परिसर याचा नजारा दृष्टीस पडला, मग काय आम्ही जय फोटोग्राफी. 


 या कातळात कोरलेल्या पायऱ्या पुढे खिंडीच्या पायथ्याला नेऊन सोडतात,या ठिकाणी जाताना एक जागी पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे चढताना थोडी अधिक सावधगिरी बाळगावी लागली. येथेच उजव्या बाजूस एक छोटी कपारीवजा गुहा आहे. 


     येथे थोडावेळ विश्राम करून आपण जेव्हा समोर पाहतो तेंव्हा पुढे अंदाजे ६० ते ७० अंशाच्या कोनात असलेल्या ८० ते १०० दगडी पायऱ्या आपल्याला वरती खिंडीच्या तोंडाशी असलेल्या भिंती जवळ जाताना दिसतात.

 
    सकाळी मावशीने भीती घातलेली भयानक खिंडीची जागा ती  हीच. आम्ही मोठ्या हिंमतीने खिंडीच्या पायऱ्या कडे कूच केले. थोड्या पायऱ्या चढतो तो काय !!
    अचानक पुन्हा जोरदार वारा  आणि पाऊस सुरु झाला. मग मात्र आम्हाला मावशीने सांगितलेल्या भीतीदायक पद्धतीने वाहणाऱ्या वाऱ्याच्या भयानकतेची प्रचीती आली. 
 वारा  इतका विचीत्र पद्धतीने वाहत होता कि त्याला पिसाटलेला हि  एकच संज्ञा योग्य  होती. प्रथम हा वारा प्रचंड वेगाने खिंडीतून खालून वर भिंतीकडे जायचा, त्यावेळी आम्हाला वरती  ढकलायचा आणि काही सेकन्द अवकाश घेऊन पुन्हा भिंती कडून वरून खाली त्याच प्रचंड वेगाने ढकलायचा. हा खरंच भयानक अनुभव होता. 
एकतर  ६० ते ७० अंशाच्या कोनात असलेल्या पोटऱ्यावर ताण  आणणाऱ्या शेवाळलेल्या पायऱ्या, त्यावर वाहणारे पाणी त्यामुळे पाय सारखा सटकायचा , त्यात खाली खिंडीतून दिसणारी १०० फुटाची दरी , वर डोक्यावर  धो धो पडणारा पाऊस आणि हा असा पिसाळलेला वारा, यात  खाली तोल गेला तर  डायरेक्ट राम  नाम सत्यच. एकूणच काय सर्व  प्रकरणच भीतीदायक होते. अशा या भन्नाट  वाऱ्याचा अनुभव आम्ही खूप वेळा घेतला होता विशेषतः कळसूबाईच्या मंदिराजवळ एन पावसाळयात वारा उभा सुद्धा राहू देत नाही , पण असा पिसाटलेला वारा  हा पहिल्यादाच पाहिला . वाटाड्या भाऊ मात्र कातळाला धरून आमची मज्जा बघत होते. मग शेवटी भाऊंनी नेहमीच्या अनुभवावरून आम्हाला सल्ला दिला कि वारा आला कि उजव्या बाजूच्या कातळाला चिटकून घायचे आणि वारा गेला कि पायऱ्या चढाई करायची.


हा सल्ला अंमलात आणून हळू हळू या ६० ते ७० पायऱ्या चढायला अर्धा तास लागला पण यात आमचा जीव मात्र अर्धा झाला. 
   या खिंडीच्या टोकाशी दोन डोंगरांना जोडण्यासाठी मोठ्या हुशारीने एक आडवी भिंत बांधली आहे,लांबून हि भिंत आहे हे लक्षात येत नाही.

शत्रूला फसवण्यासाठी हा भाग फारच भारी आहे आणि या भिंतीमुळे किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे ते लक्ष्यात येत नाही.
भिंतीजवळ गेल्यानंतर अचानक डाव्या बाजूस कातळात कोरलेला मार्ग दिसतो.
या मार्गावर सुद्धा पाणी वाहत होते आणि पायऱ्यांवर शेवाळे साचलेले असल्याने थोडे जपून चालत आम्ही कातळभिंती कडे गेलो. अहो आश्चर्यम !! साक्षात किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर आला. 
    संपूर्ण कातळात कोरलेला उत्तरपश्चिममुखी दरवाजा इतका अप्रतिम लपवला आहे कि खिंडीतून वर चढताना सुद्धा हा दरवाजा  दिसत नाही. अशा या लपलेल्या दरवाजाची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी नाशिक जिल्हातील सर्व किल्ल्यामध्ये सापडते अपवाद किल्ले हरिहर चा. याचा अर्थ हे सर्व किल्ले बांधणीनुसार समकालीन असावेत. या सर्व किल्लयावर जाणारे मार्ग म्हणजे वाटा  कातळात कोरलेल्या आहेत , तसेच त्यांचे दरवाजे सुद्धा संपूर्ण कातळात कोरलेले आहेत, या किल्ल्याचा एकही दरवाजा खालून दिसत नाही. खरंच विचार करा हे दुर्गरचनाकार किती कुशल होते. त्यांचा येथील दगडाचा, आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि दुर्ग उभारणी शास्त्राचा किती बारकाव्याने अभ्यास असेल. पण त्यापेक्षा त्यांच्या हाताखाली काम करणारे कारागीर किती कुशल असतील. त्यांच्या कौशल्याचा मोठा वाटा  या दुर्ग  उभारणीत आहे. प्रत्येक  डोंगर, तिथला कातळ,  तिथली माती वेगळी असून त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीस अनुसरून  वैशिष्ट्यपूर्ण दुर्गरचना हे या राजवटीचे कौतुकास्पद कार्य मानायला पाहिजे. हा पहिला दरवाजा अतिशय साधा आहे , काही नक्षीकाम नाही पण संरक्षणाचे कामी एकदम उत्कृष्ट आहे. या दरवाजा मधून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस सैनिकांसाठी छोटेखानी खोल्या बांधल्या आहेत. 
        येथून पुढे थोडा सर्पिलाकार शेवाळलेल्या पायऱ्यांचा कातळात कोरलेला जिना आपल्याला खिंडीवर बांधलेल्या भिंतीवर घेऊन जातो.
 
       हि  भिंत मूळ किल्ला व शेजारचा डोंगर यांना जोडते.
या भिंतीच्या रचनेचे चातुर्य असे आहे कि शेजारचा डोंगर त्यामुळे या किल्ल्या चा बुरुज वाटतो. सदर  डोंगरावर पाण्याचे कातळकोरीव दोन टाके व गणपतीची एक भग्न मूर्ती आहे. 

   या डोंगराचा वापर मूळ किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुज म्हणून केला जात असावा, कारण योग्य प्रमाणात लढाऊ शिबंदी असल्यास हा डोंगर बराच काळ लढवता येईल. असो आज खूप वारा, पाऊस व धुके असल्याने आमच्या वाटाडयाने आम्हास तिकडे जाऊ दिले नाही.
        मग आम्ही पुन्हा मागे येऊन कातळकोरीव , शेवाळलेल्या,  पावसाचे पाणी वाहणाऱ्या सर्पिलाकार जिन्याच्या पायऱ्याने आगेकूच केली.
हा भाग पण मोकळा असल्याने इथे पण खूप वारा व पाऊस होता पण दोन्ही बाजूस कातळ असल्याने आम्ही तेथून सावधपणे पुढे कूच केले. खरेतर हा अनुभव शब्दात सांगणे अवघड आहे , हि खरे अनुभवायची गोष्ट आहे.  Actually it is just a thrilling experience.

  
        दुसरा दरवाजा सुद्धा कातळात कोरलेला आहे पूर्वी येथे खूप दगड पडलेले होते पण वनखात्याने आता हा भाग पूर्ण स्वच्छ केला आहे. या दरवाजाच्या सुद्धा आतील दोन्ही बाजूस सैनिकांसाठी ओट्या सारख्या छोट्या खोल्या खोदून काढल्या आहेत.
 
    या नंतर पुन्हा पुढे कातळात कोरलेल्या १५ ते २० पायऱ्यांचा शेवाळलेला सर्पिलाकार जिना चढून  आम्ही किल्ल्याच्या माचीवर दाखल झालो.
       wow!!  काय नजारा होता !!  आजू बाजूला पहिले तर चक्क इंद्राबरोबर  त्याच्या पर्जन्यरथामध्ये बसून ढगांमधून पाऊस पाडण्याचा अनुभव येत होता. वारा प्रचंड वेगाने ढग घेऊन यायचा आणि न भिजवता नुसताच ढकलून पुढे निघून जायचा. पण वारा थांबला कि मात्र पावसाच्या जोरदार सरींनी  सारे वातावरण धुंद होऊन जायचे. पण काहीवेळा वारा आला कि क्षणभर लख्ख वीज चमकावी तसा पश्चिमेला गच्च भरलेला माणिकडोह आपली झलक दाखवायचा पण कॅमेरा सुरु करायच्या आतच पुन्हा सर्व आसमंत धुक्याने वेढुन जायचा. अक्षरशः एकमेकांचा आकार सुद्धा न दिसणारी धुक्याची पांढरी तलम चादर ओढल्याप्रमाणे दृश्य वाटायचे.
 
  किल्ल्याचा हा भाग थोडा सखल असल्यामुळे याठिकाणी हिरव्यागार मखमली गवताचा गालिचा पसरला होता आणि त्यावर सर्वत्र छोटी छोटी सुंदर पांढरी फुले उमलली होती.

दुसऱ्या दरवाजा मधून पायऱ्या चढून  पुढे आल्यावर माचीवर  डाव्या बाजूस कातळात कोरलेले एक पाण्याचे टाके आहे. 
   येथून पुढे उजव्याबाजूस पूर्वेकडे १०० मीटर वर एक पांढऱ्या रंगात रंगवलेल्या मंदिराची अस्पष्ट आकृती दिसत होती. हे एक पूर्वाभिमुखी  शिवमंदिर आहे. आज वारा  इतका जोरात होता कि आम्ही  साक्षात शिवमंदिर कडे खेचले जात होतो. 

  या शिवमंदिरकडे जात असताना कातळकोरीव टाक्याच्या वरील बाजूस उजव्या अंगाला एक मोठा मानवनिर्मित तलाव आहे,  पावसामुळे हा तलाव मस्त गच्च भरला होता आणि वाऱ्यामुळे यावर छान तरंग दिसत होते.
 
  भोलेनाथचे हे मंदिर छोटेखानी आहे. सदर  मंदिरातील नंदी बाहेर चौथऱ्यावर आहे. मंदिरात  प्रवेश केल्यावर आत भिंतीवरील कोनाड्यात गणपती, बजरंगबली व एक देवीची मूर्ती विराजमान आहेत. मंदिरामध्ये जाऊन आम्ही मग यथासांग भोलेनाथचे दर्शन घेतले.


 
       वाटाड्याच्या सांगण्यानुसार मंदिराच्या समोर दक्षिणपूर्वेकडे जाणाऱ्या पायवाटेला एक गुहा लागते, या गुहेमध्ये देवीमंदिर आहे. तसेच पुढे गेल्यावर समोर एक बुरुज दिसतो येथे एक बजरंगबली शिल्प उघड्यावर  ठेवलेले आहे.

   हडसर गावातून येणारी पहिली  खिळ्याची वाट या बुरुजावर येते. पण त्याच्यामते अशा जोरदार वाऱ्या पावसात व त्या बाजूला पायवाटावर असलेल्या गच्च चिखलाच्या राडारोड्यात जाऊन फार काही पाहण्यासारखे नव्हते.  AS PER HIM IT WAS NOT WORTH THE EFFORTS. आणि पुन्हा तेथून  जास्त वेळ झाला तर पुपरत  खिंडीतल्या पिसाट वाऱ्याची भीती होती. यामुळे आम्ही सुद्धा त्याला जास्त आग्रह न करता बाकीचा किल्ला दाखवण्याची विनंती केली. मग तो म्हणाला तुम्हाला अशी एक गम्मत दाखवतो कि इतर कुठंही तुम्हाला अशी गोष्ट पाहायला मिळणार नाही. असे सांगून त्याने मंदिराच्या पश्चिमेकडे चालण्यास सुरवात केली. 
     मंदिराच्या पश्चिमेकडून एक पायवाट तलाव  डाव्या बाजूला ठेऊन किल्ल्याच्या पश्चिम उत्तर कड्याकडे जाते त्या वाटेने आम्ही चालू लागलो. ह्या तलावाचा आकार पाहता हा तलाव उन्हाळयात सुद्धा काही प्रमाणात पाणी राखून ठेवण्यास बांधला असावा असे वाटते. या वाटेवरची संपूर्ण माती खेकड्यानी  उकरून ठेवल्यामुळे जमीन अगदी जर्जर झाली होती, त्यामुळे खूप जपून चालावे लागत होते. अशा जमिनी पावसाळ्यामध्ये आपला पाय कधी कर्णाच्या रथाप्रमाणे पकडून ठेवतील याचा नेम नाही.  मग नंतर लिगामेंट फाटल्यामुळे  ट्रेकिंग पासून संन्यास घ्यायची वेळ येते. वाटाड्या बहुतेक किल्ल्याच्या पश्चिम टोकावरून  RIVERSE WATERFALL   दाखवणार अशी शंका मला येऊ लागली. येथे कड्याच्या एकदम टोकावर एक चार पाऊल लांबीची एक वाट कड्याला खेटून उजव्या बाजूला खाली एका दगडाच्या चारीत उतरत  होती. 
   सदर चारी दोन ते तीन पुरुष खोल होती व ती पुन्हा डोंगराच्या मध्ये आत मागील बाजूस जाताना दिसत होती. आम्ही चौघांनी त्या चारीत उतरुन आत जाण्यास सुरुवात केली. सदर वाट दोन व्यक्ती बाजूबाजूला चालू शकतील इतकी रुंद आहे.

 
  वाट पुढे डाव्या बाजूला वळते आणि अचानक समोर कातळात कोरलेला दरवाजा दिसला. या दरवाजा समोर चक्क वरून कोसळणाऱ्या पाण्याने नैसर्गिक पडदा तयार केला होता. 
दरवाजाच्या आत  इंग्रजी  C  अशा आकाराची  रचना होती. समोर, डाव्या व उजव्या  बाजूस काळ्याकभिन्न कातळात कोरलेल्या तीन सुंदर गुहा आणि वरच्या बाजूस पावसाने गच्च भरलेले आकाश मस्त दृश्य होते. या तिन्ही गुहेच्या आत अजून छोट्या छोट्या खोल्या होत्या, पण त्या तीनही गुहा या एकाच व्हरांड्यात उघडतात. 

 
   मी आज पर्यंत माझ्यापरीने जितके किल्ले पहिले तेथे एकही ठिकाणी अशी अद्भुत रचना पहिली नाही. आमच्या वाटाड्याची मते सदर जागा दारूगोळा कोठार असावे पण माझ्या माहितीप्रमाणे सातवाहनांच्या काळात दारूगोळ्याचा शोध लागला होता का हा प्रश्नच आहे ? त्यामुळे मला वाटते कि सदर गुहा ह्या धान्यकोठार किंवा ध्यानसाधने साठी बांधलेल्या असाव्यात. या गुहांमध्ये मनसोक्त फोटोसेशन झाल्यावर आम्ही पुन्हा आलेल्या  वाटेने वर चढून तलावाजवळ पोचलो या तलावाच्या पश्चिम बाजूस  बांधावर काही समाधीवजा रचना आहेत. 
आतामात्र दुपार होऊन सुद्धा वारा आणि पावसाचा जोर काही कमी झाला नव्हता म्हणून वाटाड्याची सल्ल्याने आम्ही किल्ला उतरण्यास सुरवात केली. पण या गडबडीत संपूर्ण चिखल तुडवीत दुसऱ्या  दरवाज्या पर्यंत पोहचेपर्यंत आम्ही तिघांनी आपापला पार्श्वभाग चांगला सडकून आपटून घेतला. त्यामुळे कातळकोरीव पायऱ्यांचा भाग मात्र भर पावसात चक्क खाली बसून उतरलो.
शेवाळलेल्या दगडांना, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला व अंगावर सातत्याने कोसळणाऱ्या पावसाच्या संततधारांना  आपल्या ट्रेकिंग चे कौशल्य न दाखवता आम्ही चक्क पायऱ्यांना  शरण जाऊन बसत बसत उतरून कोठेही न पडता सर्व कातळ पायऱ्या व खिंड पार केली.


      अर्ध्यावाटेवर पायऱ्या उतरल्यावर झुडुपाच्या रस्त्यावर  शरयू आणि निलेश यांना नीट चालण्याचा सल्ला देताना मी स्वतः चिखलात घसरून हातातल्या अँपल फोन सह हडसर  किल्ल्याला ला  साष्टांग नमस्कार घातला. एकंदर यातून शिक्षण असे कि प्रथम स्वतःच सावध राहून इतरांना ज्ञान वाटावे. 
                  खिंडीच्या खाली पाऊस अचानक थांबला आणि आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ दिसू लागला. मग काय असं चान्स आमचे लोक थोडेच सोडणार पण त्यांनी केलेल्या फोटोग्राफीची किंमत मला आज कळली. या फोटोमधून निसर्ग इतका अप्रतिम दिसतोय कि काय सांगावे. एकही फोटो फोटोशॉप केलेला नाही.




खाली गावाजवळ आमच्या वाटाड्याचे गुराखी मित्र भेटले मग पुन्हा एक फोटो झाला.

मग मात्र भरलेल्या मनाने  त्याच परतीच्या वाटेने चिखलाने भरलेल्या बांधावर चालत आम्ही मावशीच्या घराजवळ पोहचलो.

 
    मावशीचा निरोप घेण्यास गेलो तर मावशींनी सांगितले कि गरम गरम जेवण केले आहे जेवल्याशिवाय जायचे नाही. आपल्या देशात अतिथी संस्कृती फक्त अशा ग्रामीण भागामुळे टिकून आहे. वास्तविक आम्ही सर्व खानपान सोबत घेऊन आलो होतो पण मावशी च्या प्रेमाची चव त्याला कशी येणार म्हणून मावशींनी केलेल्या नाचणीच्या गरम भाकरी, मिरचीचा ठेचा आणि वाफाळलेला भातावरच गरम पिठलं समाधानाने ग्रहण करून अन्नपूर्णेला धन्यवाद दिले. मिरचीच्या ठेच्याने मात्र दिवसभराच्या पावसात गच्च भिजून आखडून गेलेले शरीर मोकळे झाले आणि मग मावशी नको नको म्हणत असताना त्यांच्या नातवाच्या हातात पैसे ठेऊन आम्ही नाशिक कडे मार्गस्थ झालो. 

       मला स्वतःला ड्रायविंग फार आवडते पण आज ट्रेकवर  अफलातून मज्जा आल्यामुळे निलेशला ड्रायविंग करायला सांगून मी परतीच्या प्रवासात हडसर किल्ल्याच्या बाजूच्या निसर्गाची, वेड्यासारख्या पडणाऱ्या पावसाची, खिंडी मध्ये भयानक वेगाने उलटसुलट पिसाटासारखा वाहून आमची पुंगी वाजवणाऱ्या वाऱ्याची , किल्ल्यावर तुफान वाऱ्यापावसात धीर देणाऱ्या पांढऱ्या शुभ्र मंदिराची व स्थापत्यशास्त्रातील आश्चर्य असणाऱ्या कड्यावरील   धान्यकोठाराची  सुखद आठवण काढत निद्राधीन झालो. 
  

Comments

Unknown said…
फार सुंदर वर्णन, मित्रा. डोळ्यासमोर तो सगळा निसर्ग उभा राहिला फक्त एका प्रसंग व्यतिरिक्त. तुम्ही खिंडीतून वाऱ्याशी झुंझत केलेली चढाई. हा अनुभव प्रत्येक्षात घ्यावासा वाटतो. पुन्हा एकदा तुझे अभिनंदन आणि मागच्या ब्लॉग वर कमेंट बरोबर एक विनंती केलेली मी पुन्हा करतो. हाती घेतलेला हा वसा आता सोडू नकोस. तुझ्या सुदैवाने तुला शरायुची साथ आहे. हार्दिक शुभेच्छा.
Unknown said…
कमेंट लीहणार: आदेश सावंत.
Unknown said…
हडसर किल्ला च्या तर प्रेमात च पडलो इतके सुंदर वर्णन आणि फोटो आहेत, खिंडीचा प्रसंग खूपच thrilling वाटला. ग्रुप मधील memeber chi ओळख छान च सर्वात भारी मॅडम चे वर्णन,
भविष्यात कधी ही हडसर चां प्लान असेल तर मी येणार नक्की.

Dr Yogesh badarkhe.
Unknown said…
मस्त सर, किल्ल्याचे वर्णन आपण खूपच चांगले केले आहे. असेच आपण भटकंती केलेल्या किल्लाचे वर्णन आणि विश्लेषण करावे ही विनंती.
Nilesh007 said…
डॉक्टर तुम्ही जेव्हा याल नाशिकला तेव्हा सर प्लॅन करतील या पावसाळ्यात
Unknown said…
Wa!!, Rainy treak and thrilling experience of heavy winds takes us with you on fort and beautiful pictures of each place makes this writ up virtual tour.
Waiting for next fort treak.
VILAS Shinde said…
Excellent article. Neatly written article.
Thank you so much sir. Your appreciation is inspiration to write.
Anonymous said…
सुंदर अप्रतिम !!
असेच लिहित रहा !!
खुप छान !!
:) deep !!
अप्रतिम सुंदर पोटोग्राफी छान वर्णन मस्त अभिनंदन
Dipak Salunkhe said…
Its like experiencing a virtual trek. Wonderful description. Good Luck for many more treks. Will love to read more.

Dipak Salunkhe

Popular posts from this blog

रुद्रचा पावसाळी बाप्तिस्मा