FORT CHAULEHER A TRUE BROTHER OF FORT SALHER

                               किल्ले चौल्हेर --साल्हेरचा  दुर्लक्षित  जुळाभाऊ   
      साल्हेर किल्ल्याचा जुळाभाऊ आश्यर्य वाटलं ना ? हो मलासुध्दा . मला वैयक्तिक म्हणायला गेलो तर दुर्गभ्रमंतीसाठी वर्षभरामध्ये कोणताही काळ व कोणताही वेळ अत्यंत प्रिय आहे आणि डिसेम्बर महिना तसा सकाळपासुन दुपारपर्यंत छान आल्हाददायक असतो . अशाच एका डिसेंबर महिन्याच्या रविवारच्या दुर्गभ्रमंतीची आखणी  करताना ट्रेकक्षितिज या संस्थेचे संस्थापक सदस्य श्री अमित बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशिकची हे पुस्तक हाती पडले. सदर  पुस्तकामध्ये अमितजी यांनी नाशिकच्या आसपासच्या  ५८ किल्यांचे अतिशय छान वर्णन दिले आहे. खरंच दुर्गप्रेमींनी नाशिकच्या किल्ल्याच्या माहितीसाठी सदरपुस्तक जरूर आपल्या संग्रही ठेवावे. असो आजचा आपला मूळ  विषय आहे साल्हेरचा हा जुळा भाऊ कोण ? आणि त्यांच्या मध्ये एवढं काय पाहण्यासाठी वैशिष्ट्य  आहे ?
         प्रथम मला  घरात  बसून टीव्हीवर डिस्कव्हरीवर डोंगर पाहणाऱ्या माझ्या मित्रांना साल्हेर दुर्ग म्हणजे काय प्रकरण आहे हे सांगणे जरुरीचे आहे . महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर कळसुबाई आहे . त्याची उंची ५४०० फूट  इतकी आहे . त्यानंतर साल्हेरचा दुर्ग  उंची बाबत दोन नंबर ला आहे. त्याची ऊंची ५१४० फूट  इतकी आहे. परंतु महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऊंची मध्ये साल्हेर एक नंबर वर आहे. साल्हेर किल्ला उत्तुंग बेलाग दुर्गम या विशेषणात बसतो. तर अशा किल्ल्याचा जुळाभाऊ हे विशेषण मिरवणारा किल्ला कसा असेल याची कल्पना सह्यप्रेमीना आली असेल. पण दुर्दैव असे कि हा किल्ला पूर्णपणे आडवळणाला  असल्यामुळे  साल्हेर इतकी प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली नाही. बहुतेक ह्या दुर्गाच्या मनात रांगडा सह्याद्री कडूनच स्वतःची माहिती सर्वांसमोर आणायची होती म्हणून साल्हेर चे वर्णन लिहिण्याआधी चौल्हेर माझ्या  मनातून पानांवर झरझर  उतरू लागला.
         चौल्हेर हा नाशिक पासून साधारण ११० किमी अंतरावर आहे. आमच्या ग्रुप मेंबर पैकी अजयजी हातेकर  या किल्ल्यावर आधी जाऊन आले होते पण ग्रुप बरोबर जाऊन थोडी जास्त काळजी घेऊन साहसाने किल्ल्यावरील दोनचार ठिकाणे जास्त पाहता येतात म्हणून ते  बरोबर आले. वास्तविक मी सोलो ट्रेकिंगच्या पूर्ण विरोधात आहे कारण निसर्गसौन्दर्याचा आनंद सहमित्रात न वाटता एकट्यानं काय उपभोगायचा व दुसरी बाब अशी कि  ट्रेकिंग करत असताना अनुभवास येणाऱ्या सर्व अडीअडचणींना सामोरे जाताना मित्रमैत्रिणींबरोबरचे बंध अजून घट्ट होतात.  एकमेकांना आपण जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो म्हणूनच अजयजींना आग्रह करून चौल्हेर किल्ल्याच्या पुनःप्रत्ययाप्रित्यर्थ  घेऊन आलो.
          चौल्हेर ला जाण्यासाठी नाशिकहून आम्ही चौघांनी सकाळी लवकरच निघायचे ठरवले पण थोडा   तयारी ला उशीर झाल्यामुळे कालापव्यय झाला. तरीसुद्धा निलेशच्या सुधारलेल्या वाहन  कौशल्यामुळे आठ वाजता सटाण्यात पोहचलो . सटाण्यात  प्रवेश करण्यापूर्वी एक रस्ता डाव्याबाजूस मुंजवाड गावांकडे जातो. या रस्त्याने थोडी चौकशी केल्यास आपणास योग्य मार्गदर्शन मिळते.  मुंजवाड गावाकडून तिळवण गावाकडे जाणारा रस्ता सोडून वाडीचौल्हेर च्या रस्त्याने पाच ते दहा किलोमीटर जावे, जाताना डोंगररांग डाव्या हाताला ठेवावी. वाडीचौल्हेर तसे वाडी पेक्षा जरा मोठे गाव. या गावाच्या दक्षिणेस उंच आकाशाकडे झेपावणारा डोंगर दिसतो तो म्हणजे चौल्हेरचा किल्ला.
प्रथम दर्शनातच याला साल्हेरचा जुळाभाऊ का म्हणायचे ते लक्षात येते. या किल्ल्यावरून निघालेली एक डोंगरसोंड सरळ वाडीचौल्हेर मध्ये उतरते.
जसे साल्हेरवरून सालोट्याच्या खिंडीतून वाघांबे गावात उतरणारी वाट चढाई चा अंदाज देते, तशीच हे वाट चौल्हेरची डोंगरसोंड चढाई चा थोडासा अंदाज देते.
          आम्ही सटाण्यातून मुंजवाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरच एक ठेल्यावर सकाळच्या सकाळी गरम गरम वडापाव, वडारस्सा मनसोक्त खाऊन घेतला. त्यामुळे अजून चार ते पाच तास तरी पोटात कावळे कावकाव करायचा चान्स नव्हता. ट्रेकच्या आधी वडापाव खाणे ही आम्हाला पट्टाकिल्ल्याने दिलेली देणं आहे. जर तुम्ही प्रातःकाळी साडेसहा ते आठ पर्यंत गरमागरम वडापाव खाऊन  किल्ला चढायला सुरवात केली तर तुम्हाला दोन वाजेपर्यंत भूक लागत नाही हा आमचा स्वानुभव आहे . हा फंडा आम्ही कळसुबाई नाईट ट्रेक ला सुद्धा वापरतो.  यामुळे आम्हीसध्या किल्ल्याजवळच्या गावात वडापावची गाडी शोधतो, पण हा फंडा सगळयांना झेपेल असे नाही. स्वतःच्या रिस्कवर उपरोक्त प्रयोग करावा.
         असो आता वडापुराण संपवुन किल्ल्याकडे वळूया, किल्ल्याकडे जाणारी वाट गावातून जाते. गावाच्या मुख्य रस्त्यापासून डोंगरसोंडेकडे एक छोटा रस्ता जातो . या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी घरे, त्यांचे सारवलेलं  अंगण,बाहेर बांधलेल्या शेळ्या व इतर जनावरे आणि भुंकणारी कुत्री यांचेपासून सांभाळत निघालो . सकाळी या छोट्या छोट्या घरामधून कालवणाचा व गरम गरम भाकरीचा जाठराग्नी चेतावणारा मस्त वास खोल श्वासात भरून घेत आम्ही समोर दिसणाऱ्या सिमेंटच्या चौकोनी ओबडधोबड कमानीकडे वाटचाल सुरु केली.

कमानीच्या उजव्याबाजूला  एक पाण्याची मोठी टाकी आहे. समोर टेकडीवर वनखात्याने विश्रांतीसाठी बांधलेले छत असलेले चबुतरे आहेत आपण त्यांच्या दिशेने वाटचाल सुरु करायची. पहिलीच चढण  मुरमाड आहे पण सतत जनावरांच्या येण्याजाण्यामुळे फुफाट्याची झाली आहे . हा  चढ एकदम अंगावर येणारा असल्यामुळे हळू हळू चढावा लागतो .



मी झपाझप  चढायला सुरवात केली आणि मागे पाहतो ते काय आमचे तिन्ही जापानी फोटोग्राफर खचाखच 
फोटो काढणेत मग्न झाले होते. तुम्हाला जपानी लोक काय करतात ते माहीत आहे का ?  ते  सर्व जगभर प्रसिद्ध ठिकाणी  फिरतात पण सगळीकडे फक्त  डिजिटल कॅमेरा मधून हजारो फोटो खचाखच काढतात आणि नंतर घरी जाऊन शांतपणे फोटो पाहून एन्जॉय करतात.आमचे तिघे फोटोग्राफर असेच जपानी आहेत, पण ते मात्र दोन्ही गोष्टी तेवढ्याच आनंदाने करतात. चढाईच्या सुरवातीलाच हा  प्रथमग्रासे मक्षिकापात झाल्यामुळे  चढाईचा वेग एकदम कमी झाला.
       सदर डोंगरसोंडेची सुरवातीची घसरट असणारी चढाई पार करून आपण पाहिल्या टेकडीच्या माथ्यावर आलो कि तेथे बरेच वनखात्याचे चबुतरे दिसतात.
टेकडीच्या सुरवातीलाच इतके विश्रांतीसाठी चबुतरे यांचे प्रयोजन कळत नाही. या चबुतरेपासून आपण पुढच्या टेकडीकडे  चढायला सुरवात करायची हि वाट मोठी आहे. पण घसारा हि  भरपूर आहे.

याचवेळी सूर्य वरती येत होता पण किल्ल्याची वाट हि डोंगराच्या उत्तरपश्चिमेकडे चढाई असणारी असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेचा जास्त त्रास होईल असे वाटत नव्हते.
किल्ला चढाई करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी ते म्हणजे वाट पूर्वेकढुन चढणारी असेल तर सूर्योदयाच्या एक  तास अगोदर सुरवात करावी,नाहीतर गडावर राहण्यासाठी परवानगी असल्यास सूर्यास्तापूर्वी दोन तास अगोदर चढाई करावी. यामुळे उष्माघाताचा त्रास होत नाही. पूर्वेचे चढाई म्हणजे बसगड किल्ला, जिथे मला चांगलाच उष्माघाता चा फटका बसला होता.

         पहिल्या दोन टेकड्या पार केल्यावर किल्ल्यावर जाणारी वाट ठळकपणे  दिसते यासाठी सोपे चिन्ह म्हणजे या वाटेवर  मध्यभागी  एक झाड एकटया लढाऊ योध्यासारखे उभे आहे. तशी किल्ल्यावर चढताना आजूबाजूला झाडेझुडपे खूप आहेत पण या मार्गावर सावली देणारे ते एकच झाड आहे. या झाडाकडे पाहत पाहत मार्गक्रमण करावे.
या झाडापर्यंत पोहचताना सुद्धा चांगलाच चढ चढावा लागतो. त्यावर मध्ये मध्ये खूप ठिसूळ माती व हलणारे सुट्टे दगड आहेत,यातून सावधपणे हळूहळू चढाई चालू  ठेवावी. आमची इतर ट्रेकर मंडळी मात्र मस्त गप्पा मारत फोटोग्राफी करत हळूहळू येत होते. या एकटया झाडाजवळून साधारण १०० मीटर पुढे गेल्यावर वाटेत चक्क दगडात घडवलेल्या पायऱ्या दिसतात, त्या चढून गेल्यावर वाट पुन्हा उजव्या बाजूला वळते.
आतामात्र चढाईतील रुक्षपणा संपून आजूबाजूला थोडी थोडी खुरटी झाडेझुडपे दिसू लागली.
यावाटेवर पुढे मात्र डोंगर डाव्याबाजूला ठेवून या किल्ल्याच्या मधील खाचेकडे जाणारी व कड्याच्या बाजूला लोखंडी रेलिंग लावून संरक्षित केलेली २००  ते ३०० मीटर लांबीची वाट स्पष्ट दिसू लागली. सदर रेलिंग बांधल्यामुळे चौरंगनाथाच्या यात्रेवेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा मार्ग सुरक्षित झाला आहे त्यामुळे ज्याने बांधला आहे त्याला धन्यवाद.
या वाटेवरून डोंगराच्या खाचेकडे पाहिल्यानंतर मध्यभागी एक भगवा झेंडा दिसतो त्याच्याखाली मुख्य दरवाजा आहे असे अजयजींनी सांगितले.
रेलिंग जिथे संपते तिथून पुढे अचानक पूर्वेकडे डोंगरावर कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात या  पायऱ्या नागमोडी वळणे घेत वरती चढु  लागतात. या पायऱ्या पैकी काही सुरवातीच्या पायऱ्या चांगल्या आहेत पण नंतर पुढच्या पायऱ्या मात्र माती आणि सुट्टे दगड  यांनी भरलेल्या आहेत या मधून आपण सावधपणे मार्गक्रमण करीत पुढे जायचे.
       
 पुढे अचानक आपल्याला एक कातळकोरीव भिंत दिसते या भिंती जवळ गेल्यावरच  आपल्याला भिंतीच्या उजव्या बाजूस  कातळ कोरीव भिंतीचा नैसर्गिक आधार घेऊन घडीव दगडाच्या साहाय्याने बांधून घेतलेला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसतो.

हा दरवाजा पूर्णतः उत्तर पूर्वमुखी आहे. माझ्या मते अशा प्रकारच्या घडणीचे दरवाजे सातवाहन कालीन असावेत कारण त्या काळात दुर्गस्थापत्यकला त्याच्या चरणसीमेला होती. या किल्ल्याचे तिन्ही दरवाजे एकमेकांशी चक्क काटकोनात रचलेले आहेत,  काय अफलातुन बांधणी आहे. हा पहिला दरवाजा ओलांडून आत गेल्यावर कातळात कोरलेल्या पाच ते दहा पायऱ्या पुन्हा एका  कातळभिंती  समोर आणून उभे करतात. 
येथून डाव्या बाजूस पाहिल्यास वरच्या बाजूस  किल्ल्याचा उत्तरपश्चिम मुखी दुसरा दरवाजा दृष्टिपथास येतो . याच्याकडे जाताना पुन्हा कातळात ६० ते ७० अंशामध्ये कोरलेल्या साधारण  २० ते ३० पायऱ्या चढून जावे लागते. हा दरवाजा एकदम फोटोजेनिक आहे. हो हो तुम्हाला माहित नसेल पण माणसापेक्षा बरीच ठिकाणे फोटोजेनिक असतात. 

                   आमची टीम येथे  फोटो काढत असताना माझे लक्ष्य एकदम सहाव्या किंवा सातव्या पायरी कडे गेले तिथे एक पाण्याचा छोटा स्रोत होता. त्याच्याजवळ एक मधमाशांचा थवा पाणी पीत  होता. मी एकदम थबकलोच कारण काही महिण्यापुर्वीच वेगवेगळया किल्ल्यावर ट्रेकिंग ग्रुपवर मधमाश्यानी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या मी ऐकल्या होत्या. मधमाशा सहसा डिवचल्याशिवाय कोणावर हल्ला करीत नाहीत पण यांचा मूड काय आहे हे कुठे माहिते होते म्हणून अगदी सावधगिरी बाळगून पायऱ्या चढणे आवश्यक होते. मधमाशा शक्यतो मोठं आवाज, सिगारेट चा वास, तीक्ष्ण धूर , तीक्ष्ण अत्तर किंवा सध्या फेमस deoderant  चा वास यामुळे  उत्तेजीत होतात,आमच्या पैकी यामधील कश्याचाही वापर करणारे  नाहीत.  तरी सुद्धा मी एकेकाला न आवाज करता दुसऱ्या दरवाजाकडे सुरक्षित पाठवुन दिले. दुसरा दरवाजा काही प्रमाणात कातळात कोरला आहे आणि दरवाजा व उर्वरित डोंगराचा भाग छानपैकी दगडांनी बांधून संरक्षित करून घेतला आहे. 


या दरवाज्यापासून तिसऱ्या दरवाजा पर्यंतचा मार्ग काटकोनात रचलेला असून तो  कोरीव बंदिस्त विवरातून जातो. दिवसासुद्धा येथून जाताना टॉर्चचा वापर केल्याशिवाय पायऱ्या दिसत नाहित आणि रस्ता सुद्धा  दिसत नाही. या मार्गाचे छत मात्र छान कमानीच्या आकारात बांधून घेतलेले आहे.
   


 तिसरा दरवाजा पार केल्यावर आपला प्रवेश एकदम बालेकिल्ला व माची यांना जोडणाऱ्या भूभागावर होतो. या भूभागाच्या पूर्वेस खोल अशी  दरी आहे,पश्चिमेस किल्ल्याचा तिसरा दरवाजा व त्याच्या वरील बांधलेला तट आहे  ,दक्षिणेस बालेकिल्ल्याकडे जाण्याऱ्या कातळकोरीव पायऱ्या आहेत आणि उत्तरपूर्वेस माचीकडे जाणारी पायवाट आहे. प्रथम आपण कातळकोरीव पायऱ्या चढून दरवाजाच्या तटावर काय आहे ते पाहूया.  या पायऱ्या चढताना डाव्याबाजूच्या कातळ भिंतीवर एक हिरव्या रंगात रंगलेल्या गणपती कडे मात्र दुर्लक्ष्य करू नका.
हा गणपती जरी राजगडावरील सुवेळामाची एव्हढा सुरेख नसला तरी या गडावर हजारो वर्षांपासून राहणाऱ्या आणि येणाऱ्या भक्तासाठी संकटमोचक आहे. गणपतीबाप्पाला नमस्कार करून आम्ही पायऱ्या चढून  उजव्या बाजूस तटाकडे वळलो. या तटावर कोणीतरी किल्ल्यावर सापडलेली नंदीची भग्न मूर्ती व एक शिवलिंग आणून ठेवले आहे.
     तटावरून समोर पाहिल्यास दूरवर पसरलेला उत्तरपश्चिमेचा भूभाग दिसतो. तटाच्या खालील बाजूस पाहिल्यास पहिल्या दरवाज्याकडून येणारा कोरिव मार्ग दिसतो.
या खालच्या कातळभिंतीच्या पश्चिमेस थोड्या अंतरावर एक पाण्याचे टाके दिसते. 
पण तिथे जाणारा मार्ग दिसत नाही. बहुदा पहिल्या दरवाजाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी हे स्वतंत्र व्यवस्था असावी व त्यासाठी जवळच  वेगळा  मार्ग असावा. हा मार्ग शोधायची आमची सर्वांची इच्छा झाली पण योग्य प्रशिक्षण व साधन सामुग्री उपलब्ध नसल्यानं हा विचार सोडून दिला. 

  या किल्ल्याच्या माचीचा आकार  छोटा  असल्याने प्रथम आम्ही तटावरुन डाव्या बाजूने जाणारी वाट धरली. माचीचा आकार लंबगोल  आहे , मुख्य पसरट भाग बालेकिल्ल्याकडे आणि निमुळता भाग पूर्वेस आहे.
सदर  माचीवर अवशेष असे फारसे नाहीत,मध्यभागी एक उंचवटा आहे यावरून पूर्ण माचीवर लक्ष्य ठेवता  येते. या उंचवट्यावरून आजूबाजूचे फोटो फार छान येतात त्यामुळे इथे एक मस्त फोटोसेशन झाले. 


या उंचवट्याच्याखाली उजव्या बाजूस दोन कातळातकोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्याजवळून उंच गवतातून पूर्वदिशेला गेल्यास एक मोठा बांधलेला बुरुज लागतो.


या बुरुजावरून पूर्वदिशेला असणारी डोंगररांग अतिशय सुंदर दिसते. खरे तर ट्रेकर च मन या दर्शनाने  कधीच भरत नाही.  या बुरुजाच्या अलीकडे एक पाण्याचा सुकलेला तलाव दिसतो, हा तलाव फक्त  पावसाळ्यात  भरत असावा. या बुरुजावरून बालेकिल्ल्याच्या  पायथ्याचे चौरंगनाथाचे मंदिर व बालेकिल्ल्यावर फडकणारा भगवा झेंडा अगदी सुरेख दिसतो.





माचीचा आकार साधारण ६०० ते ७०० मीटर इतका असावा. 

          या माचीला पूर्ण फेरा मारून आपण पुन्हा तिसऱ्या दरवाज्याजवळ येतो. या दरवाज्यापासून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या कातळातील पायऱ्या चढून आपण त्याच्या उत्तरपूर्वमुखी कड्याच्यापायथ्याला पोचतो.
येथे कोणा  एक साधूने  छोटी कुटी बांधली आहे, या कुटीमध्ये सध्या कोणी रहात नाही. या कुटी पासून डाव्याबाजूने जाणारी वाट चौरंगनाथाच्या मंदिर जवळून संपूर्ण बालेकिल्ल्याला वळसा मारून पुनः उजवीकडून साधूच्या कुटीजवळ परत येते.
अजयजी या पूर्वी येथे येऊन गेलेले असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रथम बाल्लेकिल्ल्याला पायथ्याने प्रदक्षिणा मारायचे ठरवले. त्यानुसार आम्ही डाव्याबाजूने प्रथम चौरंगनाथाच्या मंदिराकडे निघालो. हे मंदिर छोटे असून सुंदर आहे, चौरंगनाथाची  यात्रा दरवर्षी पोळ्याच्या दरम्यान भरते.  या मंदिरात एक गणपती व एक हनुमान अशा दोन भग्न मुर्त्या आहेत.
           या किल्ल्यावर सापडणारी एक वैशिष्ठ्यपूर्ण बाब या मंदिराजवळून दिसते. या किल्ल्याच्या पुर्वउत्तर बाजूच्या कातळकड्यावर मंदिरापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर खालील बाजूस एक कातळात कोरलेले मोठे टाके आहे, असेच एक टाके माचीच्या बाजूला याच अंतरावर खाली आहे . याची गंमत  म्हणजे  एक ठिकाणावरून दोन्ही टाके दिसत नाहीत.

माची वरून चौरंगनाथाच्या पायथ्याचे टाके दिसते आणि मंदिराजवळून माचीखालचे टाके दिसते.  खरे तर किल्लयाच्या दृष्टीने या टाक्याचे प्रयोजन कळत नाही, कारण किल्ल्यावरून या टाक्याचे पाणी काढणे शक्य नाही. एक दिवस फक्त या टाक्याच्या शोधासाठी यावं लागेल असे ठरवून आम्ही मंदिराजवळून पुढे बालेकिल्ल्याच्या पायथ्याच्या फेरीला सुरवात केली. हि  वाट फारशी वापरात नसल्यामुळे ती निवडुंग आणि गवताने गच्च भरलेली होती. येथून थोडे पुढे डाव्याबाजूला खाली एक पाण्याचे टाके आहे. 
या टाक्याच्या बाजूला एक मोठे झाड तटाच्या भिंतीजवळ आले आहे. याच वाटेने पुढे गेल्यावर एक मोठा बुरुज दिसतो.
या बुरुजावरून किल्ल्याच्या  आजूबाजूचा दूरचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. या बुरुजावरून फिरून आपण किल्ल्याच्या दक्षिण  बाजूस येतो. येथून एक वाट पुन्हा बालेकिल्ल्याच्या कातळाकडे जाते हि  वाट प्रचंड घसरणीची आहे. अशी घसरणीची वाट दिसली कि  आमच्या मॅडम एकदम सावध होऊन खूप हळू हळू चढू लागतात , कारण आम्ही एकदा साल्हेर वरून वाघांबे  कडे उतरताना एका ठिकाणी डाव्या बाजूला असणारा ५०० ते ७०० फुटाचा drop बघून  तिला घसरणीचे इतकी भीती बसली कि तिला धीर देउन तिला घेउन  आम्हाला तिथून उतरायला खूप वेळ लागला. It had created a mental block for her when such situation is confronted. मग आम्हाला तिची समजूत घालून स्फुरण देऊन पुढे चालवावे लागते. पण मला तिची समजूत घालणे काही जमत नाही. कारण आम्ही दोघे आदर्श नवरा बायको असल्याने आम्ही दोघे एकमेकांचे ऐकत नाही ,मग आमचा हा छोटा मुलगा आईला धीर देऊन घेऊन येतो, भले शाब्बास. This is a unique quality of Nilesh. असो  ट्रेक वर नेहमी चार ते पाच लोक असणे जरुरीचे आहे. म्हणजे सर्व एकमेकाला सांभाळून घेऊ शकतात. या अशा एकमेकाला सांभाळण्यात आम्ही बालेकिल्ल्याच्या खालच्या कातळाला जाऊन भिडलो. पण तिथे पाहतो ते काय दोन मोठे अजस्त्र पाण्याचे टाके होते,पण एकदम कोरडे.
यामध्ये मोठे मोठे दगड पडलेले होते. श्री अमित बोरोले यांच्या पुस्तकानुसार बालेकिल्ल्याच्या माचीच्या घेरात अनेक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहेत, आम्हाला मात्र हे दोनच  सापडले. यापुढच्या वाटेवर तिरका कातळ अन खाली एक्स्पोजर खूप होते, म्हणून आम्ही माचीचे संपूर्ण फेरी न करता मागे फिरून परत चौरंगनाथाच्या मंदिराकडून उजव्या बाजूने बालेकिल्ल्यावर चढाई करावी असा निर्णय घेतला.
मग आम्ही साधूबाबाच्या कुटीजवळून  बालेकिल्ला डावीकडे ठेवून पुढे जाणाऱ्या वाटेने प्रस्थान केले. 

    सदर वाट सुद्धा ठिसूळ माती व दगडामुळे घसरडी आहे पण सावधपणे चढत मार्गक्रमण केल्यास आपण थोड्याच  वेळात आपण बालेकिल्ल्याच्या कातळभिंती जवळ येऊन पोचतो. कातळाजवळ आल्यावर हि  वाट एक पूर्वेला जाते व एक पश्चिमेला.  आपण प्रथम पूर्वेच्या वाटेवर जाऊ,साधारणपणे या वाटेवर ५० ते १०० मीटर चालल्यावर उजव्या बाजूला कातळावर साधारण जमिनीपासून पासून दीड पुरुष उंचीवर २० ते २५ फूट लांबीचे पाण्याचे टाके आहे.

गडावरील एकमेव शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मोतीटाके ते हेच. या टाक्याच्या दोन्हीबाजूकडून टाक्यामध्ये पाणी येणेसाठी दगडात पन्हाळी कोरल्या आहेत. टाके पाहण्यासाठी थोडे वरती चढून जावे लागते. यातील पाणी मस्त थंडगार आहे, इतका वेळ उन्हात फिरल्यावर या टाक्यातील पाणी पिताना अमृतप्राशनाचा आनंद मिळतो. या टाक्यातून अतिरिक्त पाणी बाहेर जाण्यासाठी सुद्धा पन्हाळ आहेत.




पण गंमत म्हणजे या पाणी जाण्याच्या वाटेवर दगडात एक शिवलिंग कोरले आहे त्याचे प्रयोजन कळत नाही. या टाक्यापासून खाली उतरलो को कातळभिंत डाव्याबाजूला ठेवून बालेकिल्ल्याच्या दक्षिणपश्चिमेकडे  जाणाऱ्या वाटेने आम्ही पुढे निघालो,
या वाटेवर डाव्याबाजूच्या कातळभिंतीत पुढे अजून दोन टाके सापडतात. यांचे नवे हत्यारी टाके आणि शेवाळे टाके असे आहे, या मध्ये एकतर पाणी नसते आणि असलेतरी  खराब असते. या दोन्ही टाक्याच्या नावाची व्युत्पत्ती काही कळत नाही. 

     या सर्व टाक्यांना मागे सोडून आम्ही बालेकिल्ल्याच्या दक्षिण पश्चिम टोकाला पोहचत असताना अचानक डाव्याबाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्या वरच्या बाजूस जाताना दिसतात, याच त्या बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या.


   


या पायऱ्या एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे वळण घेऊन आपल्याला बालेकिल्ल्याच्या दरवाजासमोर नेऊन सोडतात. या दरवाजाची वरची कमान पडली आहे. 

बाजूच्या भिंती मात्र शाबूत आहेत.  दरवाजाच्या आजूबाजूस खूप घडीव दगड पडलेले आहेत म्हणजे पूर्वी  इथे मोठे वाडे असावेत, इथून एकदम जपून आत जावे लागते. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्याबाजूस एका मोठ्या वाड्याची भिंत लागते.  या वाड्यात आत जायला भिंतीतून एक देवडीवजा रास्ता आहे,

येथून आत आपण साक्षात बालेकिल्ल्याच्या  वाड्यामध्ये प्रवेश करतो. या वाडयाला डाव्याबाजूस आणखी एक देवडी वजा दरवाजा आहे तेथे आपण नंतर जावू .
या वाड्यामध्ये पुढे आत जाताना खूपच गचपण  आहे पण पायवाट न सोडता पुढे जायचे. बालेकिल्लयावर घरांचे व  वाड्याचे अर्धभग्न अवशेष आहेत. या वाड्याच्या अवशेषानंतर पुढे असणाऱ्या टाक्याच्या पूर्वी कातळावर पाच गोल खळगे व पाणी जाण्यासाठीची वाट दिसते.
पण कितीही विचार केला तरी याचा उपयोग काय ते काळात नाही. याच्या पुढे पाण्याचे टाके असल्याने व हा भाग जर वाड्याशी  संलग्न असेल तर हे न्हाणीघराचे अवशेष असावेत असं वाटते. अशीच रचना इथून जवळच असणाऱ्या सटाण्याजवळील दुधा किल्ल्यावर आहे. पुढे गेल्यावर मध्यभागी पाण्याचे चार स्वतंत्र कातळकोरीव टाके आहेत,
ज्यांचा आकार इंग्रज़ी L अक्षराप्रमाणे वाटतो. या प्रत्येक  टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा दिसतो. या चार पाण्याच्या टाक्याची साठवण क्षमता पाहिल्यावर बालेकिल्लयावर सुद्धा पाण्याची किती उत्तम सोय आहे हे ध्यानात येते.


म्हणजे माची जरी शत्रूच्या ताब्यात गेली तरी बालेकिल्ला पाण्यावाचून अडचणीत येणार नाही. या टाक्याच्या मागील बाजूस किल्ल्याचा सर्वोच्य माथा आहे. या माथ्यावर स्वराज्याची  शान असणारा भगवा दिमाखाने डौलदारपणे फडकत होता.
 

    इथे पोहचल्यावर याला साल्हेरचा जुळा  भाऊ का म्हणायचे याचा अंदाज येतो कारण ज्याप्रमाणे साल्हेरच्या परशुराम मंदिराजवळ उभे राहिल्यावर  उत्तुंग या शब्दाचा अर्थ कळतो त्याच प्रमाणे चौल्हेरच्या बालेकिल्ल्यावरील  या ठिकाणी हाच अनुभव येतो. अशा सर्वोच्य शिखरावरून आजूबाजूला पाहिल्यावर  दूरवर दिसणाऱ्या पर्वतरांगा, आकाशातील विविध रंगाच्या छटा आणि सभोवताली पसरलेल्या छोट्या छोट्या वस्त्याचे विहंगम दृश्य दिसते. मला खूप वेळा अशा ठिकाणवरून परत घरी जायची इच्छाच होत नाही. SOMEWHERE DEEP DOWN IN MY HEART I FEEL I BELONG HERE ONLY.



            या शिखरावर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी  भरपूर फोटोग्राफी  व व्हिडिओग्राफी केल्यावर त्यांचा शिखर सर केल्याचा आनंद हळू हळू ओसरू लागला आणि  थोड्यावेळाने   सकाळी खाल्लेल्या वडापावचा असर कमी झाल्याने चेहेरे क्षुधार्त दिसू लागले. परंतु अजून बराच किल्ला बघायचा राहिल्यामुळे आम्ही असे ठरवले कि किल्ला पाहून खाली गावात जाऊन भोजन  करावे.  याचे दुसरे कारण म्हणजे चौरंगनाथाचे मंदिर सोडले तर या किल्ल्यावर उन्हात डबा खाण्यासाठी बसायला सावलीचे ठिकाण नाही. फक्त किल्ला चढताना मध्यभागी एकच झाड आहे ते फक्त यासाठी योग्य आहे. 
   मग आम्ही किल्ला उतरायला सुरवात केली पण या किल्ल्यावरील वाड्याच्या उजव्या बाजूच्या देवाडीतून खाली उतरणाऱ्या वाटेने दिसणाऱ्या देवडीने  आमचे लक्ष्य वेधले,
या वाटेने थोडी कसरत करीत पुढे गेलो तर तेथे कड्यावर वाड्याचा अजून एक देवडीवजा दरवाजा होता.
या दरवाजाच्या खालील बाजूस कातळात कोरलेले दोन ते तीन टाके किंवा तळघरे आहेत. माझ्यामते हे बहुदा दारूगोळा कोठारे असावीत, कारण किल्ल्यावर पाण्याची ठिकाणे खूप आहेत आणि असे गुप्त ठिकाण दारूगोळा कोठारासाठी योग्य आहे.


या सर्व गोष्टी बालेकिल्ल्यावर पाहिल्यावर  असे वाटते कि हा किल्ला नक्की कोणातरी मोठ्या सैनिकी असामीचे ठाणे असावा. यानंतर  मात्र आम्ही बालेकिल्ला उतरायला सुरवात केली.
       तेवढ्यात मला अमितजी यांच्या पुस्तकात वर्णन केलेल्या बालेकिल्ल्याच्या तळातील पश्चिमबाजूकडील गंगाजमुना टाक्याचे आठवण झाली. आतामात्र भूक लागल्यामुळे सर्वांचा उत्साह थोडा कमी झालं होता पण गडावरील एकही ठिकाण पाहणे सोडायचे नाही म्हणून आम्ही बालेकिल्ल्याच्या पायऱ्या उतरून घसरत्या मुरमाड पायवाटेने कातळ भिंत डाव्याबाजूस ठेऊन पश्चिमेकडे निघालो. एक ५० मीटर गेल्यावर काय गंमत सापडली, पुढे एकमेका जवळ असणारे दोन खूप मोठे टाके दृष्टीपथास आले.


यात एकामध्ये हिरवे पाणी  तर एकामध्ये चक्क पाणी काळे आहे.  या टाक्यांना दिलेली गंगाजमुना नावे  मात्र अलीकडची वाटतात. या टाक्याजवळून पुढे जाण्याऱ्या पायवाटेने सरळ गेल्यास गडाला वळसा मारून पुन्हा चौरंगनाथाच्या मंदिरापर्यंत जाता येईल पण मगाशी धाडस न दाखवल्यामुळे आत्तासुद्धा आम्ही मागे फिरून आलेल्या वाटेनं गड  उतार  होण्याचा निर्णय घेतला. 
    किल्ल्याचे सर्वांगाने यथोचित दर्शन झाल्याने आत्तापर्यंत सर्वाना प्रचंड पारलौकिक सुख  मिळत होते व त्यामुळे  त्यांना भुकेसारख्या इहलौकिक सुखाची आठवण होत नव्हती. पण आता मात्र पोटात कावळे कोकलू लागल्यामुळे या इहलौकिक सुखाची तीव्र इच्छा होऊन, आम्ही झपाझप किल्ला उतरायला सुरुवात केली.

   
मग काय फक्त दुसऱ्या दरवाज्याजवळील मधमाश्याच्या डंख मारायच्या कौशल्याची परीक्षा न घेता सावधपणे पायऱ्या पटापट उतरुन अर्ध्या तासात मध्यभागी असणाऱ्या झाडाजवळ पोचलो. चार त पाच तास कडक उन्हात फिरल्यावर  सावलीचे एकच  झाड मिळाले कि  मग सावलीसाठी का होईना पण  सर्व डोंगरावर वृक्षलागवड व वृक्षजपणूक करायला हवी याची तीव्र जाणीव होते. एखाद्या मोठ्या युद्धाच्या नंतर लांब रपेटी नंतर  महाराजांचे मावळे जसे हातातच भाकरी तिखट, तेल आणि  कांद्याबरोबर लावून खायचे तसे आम्ही मोहीम पूर्ण करून मस्त एकमेकांच्या घरून आणलेल्या पदार्थाचा गोपाळकाला करून आस्वाद  घ्यायला सुरुवात केली .  
     त्याचवेळी खालून डोंगरावर गुरे घेऊन चढणाऱ्या मुलांनी त्यांच्या मोबाईलवर लावलेल्या हिंदी गाण्याच्या मधुर सुरांनी आमच्या डोंगरभोजनात आणखी गोडवा निर्माण केला. वा भोजनासाठी काय सुंदर जागा होती , मागे पाठीशी उत्तुंग बेलाग चौल्हेर , समोर लांबवर क्षितिजापर्यंत पसरलेल्या डोंगररांगा, हिरव्यागार शेतजमिनीचे छोटे छोटे विखुरलेले तुकडे, त्यामधून एकमेकाला घट्ट धरून राहिलेली  वाडीसमूहातील घरे आणि याच वेळी अचानक येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक अशी डाईनिंग रूम करोडो रुपये देऊनसुद्धा मिळणार नाही. पण तुम्ही जर डोंगरभटके असाल तर मात्र तुमच्यासारखे अब्जोपती तुम्हीच कारण तुमच्या आनंदाला आणि सुखांना सीमाच नाहीत. 

  




Comments

Nilesh007 said…
सर खूपच छान. स्वतःचे लिखाण आणि टायपिंग पण स्वतःच करून ब्लॉग तयार करणे सोपे नाही. असे फक्त रांगडा कोल्हापूरकरच करेल. ग्रेट सर
Unknown said…
Very well written. Gives the experience of vitual treak . All photos take you on trip. 👍
Unknown said…
अतिशय सुंदर वर्णन. फोटोमुळेतर आणखीनंच बहार आली.ऐखाद्या ब्लॉग मधे चेहरा व त्याखाली नांव लीहा,म्हणजे सर्व गडकर्यांशी ओळख होईल आमची.
शशांक देशपांडे.
सर्व डोंगरावर वृक्षलागवड व वृक्षजपणूक करायला हवी याची तीव्र जाणीव होते. हे तुमचे सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या किल्ल्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद..
जय भवानी... जय शिवाजी.. जय महाराष्ट्र..
Sandeep Rathod said…
अतिशय सुंदर वर्णन. फोटोमुळेतर आणखीनंच जिवंतपणा आला आहे. तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा.
-- संदीप राठोड
Unknown said…
खुप मस्त अनुभव सांगितला सर, गड चढताना दिशा चे महत्व आणि वेळ कशी निवडावी.
Unknown said…
मित्रा, अतिशय सुंदर वर्णन केलेस. डोळ्या समोर तो निसर्ग उभा राहिला. भरपूर पाऊस आणि गर्द झाडी अनुभवली असल्यामुळे तर visualisation सोपं होतं. हा हाती घेतलेला वसा आता सोडू नकोस. आदेश सावंत.
सर,आपले आभार,आपण साल्हेर चा जुळाभाऊ म्हणून चौल्हेर किल्ला व त्याची माहिती त्यासोबत किल्ले पर्यटनाची वर्णनात्मक आणि सोबती का आसावेत? ही माती दिली चढण्याची वेळ, सोबत असलेले जानकार, किल्याच्या ठिकाणांचे नावासहित वर्णन, मार्गक्रम कसा आणि त्या सोबत पाळावयाचे नियम तसेच घ्यावयाची याबाबत केलेले वर्णन, ऐतिहासीक व भूभागाचे भोगोलिक महत्त्व याचे संक्षिप्त वर्णन, निर्मितीचा आंदाजाचा आपण लावलेला कयास या व उपरोक्तबाबी गिरिभ्रमन करणार्यास महत्त्वाच्या आहेत. एकंदर आपण दिलेली माहिती व आपणास आलेला अनुभव मनातून शब्दात सरळ भाषेत समजेल आसाच मांडला आहे. पुनः एकदा चौल्हेरचे प्रत्यक्षात सफर तुमच्या नजरेने फिरवलीत त्याबद्दल धन्यवाद।
Anonymous said…
Anonymous said...
उत्तम मांडणी, सुंदर प्रहसन, उत्तम प्रकारे फोटोजचा वापर, सर्वच व्यक्तिनची मांडणी योग्य प्रकारे करण्यात आली असुन
असचे नवीन नवीन निसर्गच्या सानिध्यातिल डोंगर, किल्ले यांची सफर ब्लॉग द्वारे मांडत जावो ही विनंती.!!
:) deep !!

Popular posts from this blog

किल्ले हडसर एक पावसाळी चढाईचा अनुभव

रुद्रचा पावसाळी बाप्तिस्मा